शेअर निर्देशांक कोसळले
जगभर करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, रिझर्व्ह बॅंका अशा परिस्थितीत आणखी मदत देण्यासाठी पुढाकार घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे जगभर शेअरबाजार निर्देशांक कोसळत आहेत.

मुंबई – जगभर करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, रिझर्व्ह बॅंका अशा परिस्थितीत आणखी मदत देण्यासाठी पुढाकार घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे जगभर शेअरबाजार निर्देशांक कोसळत आहेत. गुरुवारी भारतीय शेअरबाजार निर्देशांक 3 टक्क्यांपर्यंत कोसळले.
मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1114 अंकांनी म्हणजे 2.96 टक्क्यांनी कोसळून 36,553 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 326 अंकांनी कोसळून 10,805 अंकांवर बंद झाला. हा निर्देशांकांचा दोन महिन्याचा नीचांक आहे.
अमेरिकेन शेअरबाजार निर्देशांकांच्या आधारावर जागतिक शेअरबाजार निर्देशांकांची दिशा ठरते. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने बेकारी आणि मागणीचा अभाव हे भयंकर प्रश्न निर्माण झाले असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे प्रदीर्घकाळ व्याजदरात वाढ करण्याचा प्रश्नच नाही, या फेडरलच्या वक्तव्यानंतर अमेरिका, युरोप, आशियायी शेअरबाजाराचे निर्देशांक कोसळले.
सेन्सेक्स व निफ्टीत गेल्या सहा दिवसांपासून एकतर्फी घसरण होत आहे. आज हिंदुस्तान युनिलिव्हर वगळता सर्व कंपन्यांनी सपाटून मार खाल्ला. जीओजी वित्तीय सेवा या संस्थेचे संशोधक व्ही. के. विजयकुमार म्हणाले की, गेल्या अनेक दिवसापासून भारताबरोबरच जागतिक शेअरबाजाराचे निर्देशांक वाढत होते.
विकासदर वाढत नसताना निर्देशांक वाढत असल्याबद्दल अनेकानेक चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे सध्या होत असलेले करेक्शन योग्यच आहे. टीसीएस, रिलायन्स, इंडसइंड बॅंक, टाटा मोटर्स, बजाज फायनान्स, ग्रासिम, इन्फोसीस या कंपन्यांच्या शेअरच्या भावात आज घट झाल्यामुळे निर्देशांकाला आधार मिळाला नाही. जोपर्यंत करोनावर लस मिळत नाही तोपर्यंत शेअरबाजारात संदिग्धता कायम राहण्याची शक्यता आहे.





