मुंबई – “अवतार 2: द वे ऑफ वॉटर’ हा बहुचर्चित सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, सिनेमागृहात या चित्रपटाने अक्षरशः धुमाकूळ घातल्याचं दिसून येत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दमदार गल्ला कमवला आहे. आश्चर्यकारक स्पेशल इफेक्ट्स, व्हीएफएक्स आणि बॅकग्राउंड स्कोअर मुळे सिनेमाने एक वेगळीच उंची गाठली आहे. हे सर्व पाहणे हा भारतीय प्रेक्षकांसाठी पूर्णपणे नवीन अनुभव असल्याचं पाहायला मिळत आहे.
समुद्र आणि त्यांच्यातील बोटीच्या निळ्या जगाची ओळख करून देणारा जेम्स कॅमेरॉनचा ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ या सिनेमाची लोकांमध्ये खूप क्रेझ पाहायला मिळत आहे. दरम्यान, या सिनेमाने ओपनिंगच्या दिवशी अपेक्षेप्रमाणे कमाई केली आहे. पहिल्या दिवशी सिनेमाने तब्बल 41 कोटींची कमाई केली असून, दुसऱ्या दिवशी देखील या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.
प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ‘अवतार 2’ ने भारतात 41 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशीही या सिनेमानं जवळपास 42-43 कोटींची कमाई केली आहे. दोन दिवसांत या सिनेमानं जवळपास 83-84 कोटींचे कलेक्शन केले आहे. तर, जगभरात ‘अवतार 2’ ने दोन दिवसांमध्ये तब्बल 1500 कोटींची दमदार कमाई केली आहे. दरम्यान, कमाईच्या बाबतीत या सिनेमानं बॉलिवूडच्या अनेक बड्या चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.
‘दृश्यम 2’च्या कमाईत घसरण…
‘अवतार 2’ समोर येताच ‘दृश्यम 2’ची कमाई लाखांवर गेली आहे. ‘दृश्यम 2’ ने सुरुवातीच्या आकडेवारीनुसार 29 व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 70 लाखांचा व्यवसाय केला आहे. अशा स्थितीत आता या सिनेमाला 250 कोटींचा आकडा गाठणे फार कठीण वाटत आहे.