लोणी काळभोर -आगामी काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सर्वच क्षेत्रात जोरदार प्रगती करणार आहे, असा आत्मविश्वास शिवसेनेचे हवेली तालुकाप्रमुख प्रशांत काळभोर यांनी व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस हवेली तालुका शिवसेनेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त हवेली तालुक्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. लोणी काळभोर येथील 5000 कुटुंबांना मोफत धान्य वाटप, वाघोली येथे 59 लाख रुपये खर्चाच्या रस्त्याचे भूमिपूजन व पेरणे फाटा येथे रक्तदान शिबिर आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी माजी सरपंच वंदना काळभोर, जिल्हा संघटक रमेश भोसले, शाखा प्रमुख राहुल काळभोर, लोणी काळभोर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे संचालक प्रताप बोरकर, विठ्ठल काळभोर, धोंडिबा काळभोर, बाजीराव काळभोर ज्ञानेश्वर काळभोर, संतोष भोसले, माजी उपसरपंच इंद्रभुज काळभोर, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब काळभोर, विजय ननवरे, पांडुरंग केसकर, उद्योजक गणेश गायकवाड, राज काळभोर, शैलेश काळभोर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रशांत काळभोर पुढे म्हणाले, करोना संक्रमण वाढत चालले आहे. सतत होणाऱ्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनतेची आर्थिक स्थिती ढासळली आहे. हा विचार करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त लोणीकाळभोर गावांमध्ये 5000 धान्य किट वाटण्यात आले आहेत. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर कटके यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.