कैरो – इजिप्तमधील महाकाय पिरॅमिड आणि स्फिंक्स हे जगाचे नेहमीच आकर्षण राहिले आहे. आता या स्फिंक्सच्या प्राचीनपणाबाबत नवीन संशोधन केले जात आहे. सध्याच्या मान्यतेप्रमाणे स्फिंक्स 4500 वर्षे प्राचीन आहे, पण या नवीन संशोधनाप्रमाणे स्फिंक्सचा इतिहास त्यापेक्षा खूपच जास्त पुरातन असावा.
इजिप्तमधील गिजा शहरात असलेली स्फिंक्स ही सिंहाचे शरीर आणि मानवी चेहरा असलेली एक महाकाय आकृती आहे. नाईल नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेली ही आकृती पिरॅमिडच्या रक्षणासाठी बनवण्यात आल्याची मान्यता आहे.
लेखक आणि संशोधक अनएक्सटी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे स्फिंक्सचे वय इसवीसन पूर्व दहा हजारपेक्षा जास्त असावे. प्रख्यात संशोधक आरए श्वॉलर डि लूबिक्ज यांचा हवाला देऊन अनएक्सटी यांनी हि माहिती प्रसिद्ध केली आहे.
इजिप्तमध्ये पडणाऱ्या पावसाचा अंदाज घेऊन आणि त्याचा या स्फिन्क्सवर होणार परिणाम लक्षात घेऊन हे वय ठरवण्यात आले आहे. स्फिंक्सवर पावसाच्या पाण्यामुळे सध्या ज्या खुणा तयार झाल्या आहेत त्या गेल्या पाच हजार वर्षात तयार झाल्या असण्याची शक्यता नाही. त्यामुळे या खुणा त्यापूर्वी तयार झाल्या असून तो कालावधी दहा हजार वर्षाचा असू शकतो.
अर्थात या नवीन संशोधनावर टीकाही होऊ लागली आहे. केवळ पाण्याने झालेल्या खुणांच्या आधारे एखाद्या पुरातन वास्तूचे वय ठरवता येणार नाही असे टीकाकारांचे म्हणणे आहे.