satara | देशरक्षण करणारा सैनिक हाच खरा हिरो

सातारा, (प्रतिनिधी) – भारताच्या सीमेवर अहोरात्र गस्त घालणाऱ्या सैनिकांमुळेच देशातील जनता सुखाने झोपू शकते, हे वास्तव आहे. अतिशय खडतर परिश्रम घेऊन प्रत्येक सैनिक आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण करत असतात. देशसेवा करणारे सैनिक हेच खरे हिरो असून त्यांच्यामुळेच आपला भारत देश सुरक्षित आहे, असे प्रतिपादन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
झरेवाडी, ता. सातारा येथील सुपुत्र सुभेदार संतोष हरिदास काटकर हे ८४ आर्मड रेजिमेंट मधून ३० वर्षांची देशसेवा बजावून निवृत्त झाले. त्यांच्या सेवापूर्तीनिमित्त झरेवाडी येथे सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते सुभेदार काटकर यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी शिवसह्याद्री परिवाराचे अध्यक्ष ज्ञानेश्वरभाई वांगडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, पत्रकार विनोद कुलकर्णी, सातारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक निलेश तांबे, भाजपचे शहर उपाध्यक्ष अमर बेंद्रे, आम्ही सातारकर संघटनेचे अध्यक्ष मनोहर भातुसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, सातारा जिल्हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. देशाच्या रक्षणासाठी आपल्या जिल्ह्याने नेहमीच सिंहाचा वाटा उचलला आहे. आजही आपल्या जिल्ह्यातील हजारो सैनिक देशरक्षणासाठी अहोरात्र कर्तव्य बजावत आहेत. सैनिक हेच आपल्या देशाचे खरे हिरो आहेत.
अतिशय खडतर जीवन जगून सैनिक आपले कर्तव्य निष्टेने आणि प्रामाणिकपणे पार पाडत असतात. आजीमाजी सैनिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध राहिलो आहे. सैनिकांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.
अशा खऱ्याखुऱ्या हिरोना माझा सलाम! कार्यक्रमाला करंडीचे सरपंच शशिकांत जाधव, झरेवाडीच्या सरपंच ज्योती नगरे, अंबवडेचे सरपंच संजय गुजर, पोगरवाडीच्या सरपंच सौ. घोरपडे, चंद्रकांत वांगडे, विश्वास जाधव, पोलीस पाटील विनेश काटकर, आम्ही सातारकर संघटनेचे तालुका अध्यक्ष अतुल काटकर, नीलकंठ निपाणे यांच्यासह विविध मान्यवर, पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





