सातारा, (प्रतिनिधी) – महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीची अनेक मैदाने मारणारा महाराष्ट्र चॅम्पियन बोरगाव (ता. सातारा) येथील गंध ग्रुपच्या ‘गंध’ या बैलाचे नुकतेच आजाराने निधन झाले. त्याच्यावर बोरगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. जनावरांच्या बाजारात कसबाच्या दावणीला चाललेलं सहा महिन्याचं वासरु पाहून बोरगावच्या पांडुरंग साळुंखे यांना त्याची दया आली. कसाबाला पैसे देऊन त्याला घरी आणलं. पोटाला भकाळी पडलेल्या त्या वासराला पप्पूशेठ बोरगावकर व अजिंक्यतारा साखर कारखान्याचे कर्मचारी अमोल भोसले यांच्या देखभाली खाली गोंडस बनवलं. सहा महिन्यातच वारूगत उधळलेल्या वासराचा गंध सर्वदूर पसरल्याने त्याच नाव ‘गंध’ आणि सांभाळ करणारे बैलगाडा शर्यतीवान ‘गंध ग्रुप बोरगाव ‘ म्हणून नावारूपाला आले. बैलगाडा शर्यतीना बंदी असतानाच्या काळात बिनजोड गंध ने शर्यतीची तीस ते पस्तीस मैदाने सलग मारून तो महाराष्ट्र चॅम्पियन ठरला होता. महाराष्ट्रभरातील अनेक मैदाने जिंकणाऱ्या गंधच्या निधनाने बोरगाव परिसर तसेच महाराष्ट्र भरातील बैलगाडा शौकिनांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.