एसटीच्या विभागीय कार्यशाळेत 27 झाडांची कत्तल

ठेकेदारावर गुन्हा दाखल : फांद्यांऐवजी छाटली झाडे
पुणे – एस.टी. महामंडळाच्या शंकरशेठ रस्त्यावरील विभागीय कार्यशाळेच्या आवारातील तब्बल 27 झाडांची कत्तल करण्यात आली आहे. ही धक्कादायक बाब उघडकीस आल्यावर महामंडळाने स्वारगेट पोलीस ठाण्यात ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
महामंडळाने आवारातील 32 झाडांच्या फांद्या कापण्याची परवानगी महापालिकेकडे मागितली होती. ती मिळाल्यानंतर महापालिकेच्या अभिलेखावर असलेल्या ठेकेदाराला त्यांनी काम सोपवले. मात्र, ठेकेदाराने फांद्यांऐवजी झाडांची कत्तल केली. याप्रकरणी विभागीय अभियंता विजय रेडेकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विभागीय कार्यशाळेच्या आवारात पार्किंगच्या जागेत झाडांचा विस्तार झाला होता.
फांद्या धोकादायक झाल्याने कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका होता. या फांद्या बसच्या छतास लागून नुकसान होत होते. तसेच सीमा भिंतीलगतच्या सोसायट्यांतील सदनिकांच्या गॅलरीतही फांद्या जात होत्या. यामुळे नागरिक वारंवार तक्रार करत होते. यामुळे झाडांच्या फांद्या कापणे आवश्यक असल्याने महापालिकेकडे फांद्या छाटनीची परवानगी 30 सप्टेंबर 2019 रोजी मागण्यात आली. तर 7 ऑक्टोबर 2019 रोजी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाचे पर्यवेक्षक देवीदास भुजबळ यांनी झाडांची पहाणी केली.
यानंतर 18 ऑक्टोबर 2029 रोजी पत्र मिळाल्यानुसार, पुढील तीन महिन्यांत 32 झाडांची छाटणी करण्याची परवानगी मिळाली. यानंतर महापालिकेने सूचवलेल्या ठेकेदारांकडून जाहीर निविदा मागवण्यात आल्या. यानंतर ठेकेदार रविंद्र पोळ व त्यांचे सहकारी रविंद्र सावले यांनी निविदा भरुन काम घेतले. दरम्यान दि.20 ते 29 फेब्रुवारीदरम्यान झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम करण्यात आले. मात्र, ठेकेदाराने झाडे बुंध्यासकट कापून नेली.
त्याला जाब विचारला असता, त्याने ही तोडलेली झाडे वाहनातून नेली. याप्रकरणाचा तपास स्वारगेट पोलीस करत आहेत. ठेकेदाराने झाडांची कापणी करुन ती विक्री केल्याचा संशय आहे. त्याच्याकडून तोडलेली झाडेही हस्तगत करण्यात येणार आहेत.





