वडगावशेरी, दि. 18 (प्रतिनिधी) -पुणे-नगर महामार्गावरील इनॉर्बिट चौक आणि टाटा गार्डन चौक धोकादायक झाला आहे. सिग्नल सुरू असतानाही तो मोडणे, वेगाने वाहन चालविणे, असे प्रकार येथे घडत असताना वाहतूक पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. विमाननगर आणि चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्द वादामुळे येथील चौक, रस्ता ओलांडताना मोठा अपघाताचा धोका निर्माण झाला असून पोलिसांच्या हद्दीच्या वादात वाहतूक कोंडीचा प्रश्न अडकला आहे. पुणे-नगर रस्त्यावरील विमाननगर परिसरात अनेक महत्त्वाची कार्यालये आहेत, त्याशिवाय फीनिक्स आणि इनॉर्बिट हे मोठे मॉल आहेत. त्यामुळे हा रस्ता हा रस्ता नेहमीच वर्दळीचा असतो. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी याठिकाणी सिग्नल यंत्रणा असली तरी वाहतूक पोलीस नसल्याने बहुतांशी वाहन चालक नियम मोडत वाहने वेगाने चालवत आहेत. हद्दवाढीचा मुद्दा बाजून ठेऊन येथील वाहतूक नियमन करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, इनॉर्बिट चौक आणि टाटा गार्डन चौक धोकादायक झालेले असताना येथे एखाद-दुसरा दिवस पोलीस असतात. त्यामुळे स्थानिक तरूणांना पुढाकार घेत वाहतूक नियमन करावे लागत आहे.