प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वयंस्फूर्तीने गाव, तालुके बंद
पुणे – ग्रामीण भागात करोना प्रादुर्भाव वाढत आहे. विशेषत: शहरालगतच्या गावांमध्ये संख्या अधिक आहे. त्यामुळे हवेली, मुळशी, मावळ, खेड, पुरंदर या तालुक्यांतील काही गावे स्वयंस्फूर्तीने गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेत आहे. मेडिकल आणि दवाखाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवावी, ग्रामस्थांनी घराबाहेर पडू नये, लक्षणे दिसल्यास तत्काळ आरोग्य विभागाला कळवावे, असे आवाहन केले जात आहे.
सध्या ग्रामीण आणि नगरपालिका हद्दीत मिळून रुग्ण संख्या तब्बल दीड हजारांवर पोहोचली आहे. त्यामध्ये सर्वाधिक संख्या हवेली तालुक्यातील असून, आतापर्यंत पाचशेचा आकडा पार केला. त्यापाठोपाठ दौंड, खेड, मुळशी, मावळ, पुरंदर या गावांमध्ये संख्या अधिक आहे. हवेली तालुक्यातील मांजरी बुद्रुक येथे आतापर्यंत सर्वाधिक 109 बाधित सापडले. तर, 64 जणांना घरी सोडले. 45 जणांवर उपचार सुरू आहे. तसेच नऱ्हे येथे 54, वाघोली 33, खानापूर 43, न्यु कोपरे येथे 25 बाधित सापडले.
त्याचप्रमाणे अन्य तालुक्यांतील काही गावांमध्ये अशाच पद्धतीने बाधित संख्या वाढत आहे. त्यामध्ये मुळशी तालुक्यातील भूगाव, शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, शिरूर ग्रामीण (जुने शिरूर), जुन्नर तालुक्यातील खामुंडी, सावरगांव, खेड तालुक्यातील येळवंडी, खराबवाडी, सोलू, निघोज, कडूस, चाकण नगरपालिका, राजगुरूनगर, सासवड नगरपालिका, गुऱ्होळी, भोर तालुक्यातील नाझरे, रायरी यासह अन्य तालुक्यांतील काही गावांमध्ये 5 ते 10 पेक्षा अधिक बाधित सापडले आहेत.