Pune : यूजीसीची सेट परीक्षा चार मे रोजी होणार

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यांतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात सेट परीक्षा दि. 4 मे 2025 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे यांनी याबाबतची माहिती परिपत्रकाद्वारे दिली आहे.
सेट परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याचे विद्यापीठातर्फे प्रसिद्ध करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर ही परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन होणार, याबाबत विविध पातळ्यांवर चर्चा केली जात होती. मात्र, यूजीसीच्या सूचनेप्रमाणे ही सेट परीक्षा पारंपरिक पद्धतीने घेतली जाणार आहे.
या परीक्षेसंदर्भातील सविस्तर वेळापत्रक अभ्यासक्रम व इतर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केली जाणार आहे, असेही डॉ. ज्योती भाकरे यांनी परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध केले आहे. दरम्यान, सेट परीक्षेची तारीख जाहीर झाली असल्याने प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना तयारी करणे शक्य होणार आहे.





