satara | बोरगावातील सेवारस्ता वाहतुकीसाठी खुला
नागठाणे, (प्रतिनिधी)- महामार्ग सहापदरीकरणाच्या कामांतील त्रुटीमुळे बोरगावातील सेवारस्त्यावर पावसामुळे पाण्याचे प्रचंड मोठे तळे साचले होते. पाण्याचा निचरा होत नसल्याने वाहन धारकांना पाण्यातून वाहने चालवावी लागत होती. याबाबत बोरगाव परिसरातील सर्व सेवारस्त्यांबाबत दै. प्रभातने सचित्र वृत्त प्रसिद्घ केल्यानंतर ठेकेदार जैन कंपनी खडबडून जागी होत पाण्याचा निचरा केल्याने रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला आहे.
या समस्येमुळे बोरगावसह परिसरातील नागरिकांना वाहतुकीसंदर्भात चांगल्या सेवा पुरविण्यासाठी बोरगाव सरपंचांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता. दै. ‘प्रभात’ च्या बातमीनंतर दणक्याने खडबडून जागे होऊन जैन कंपनीचे अभियंता विनोद शर्मा मजूर व मशिनरीच्या लवाजम्यासह हजर झाले.
प्रथम साठलेल्या पाण्याचा निचरा करून नंतर नाल्यापेक्षा रस्त्याची उंची वाढवून सेवा रस्ता वापरण्यायोग्य केला. सातारा बाजूकडे जाताना निर्माण झालेल्या उंचवट्याजवळ भराव करून वाहनांना चढउतार करण्यास योग्य असा रस्ता तयार करून घेतला. यापुढे प्रवाशांच्या सुरक्षेविषयी योग्य ती काळजी घेऊ, असे त्यांनी सांगितले. हे काम करण्यास कंपनीस भाग पाडल्याबद्धल सरपंच अजित निकम यांनी दै. ‘प्रभात’ चे आभार मानले.





