पुणे जिल्हा | सुळेंची दुसरी पिढी रणभूमीत दाखल

बारामती (प्रतिनिधी)- बारामती लोकसभा मतदारसंघाचा राजकीय आखाड्यात प्रचाराला वेग आला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पवार कुटुंबीय सक्रिय झाले आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचाराचा ज्वर शिगेला पोहोचला आहे. पवार कुटुंबीयातीच चौथी पिढी राजकारणात स्थिरावली आहे.
आता यंदाच्या निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे या बारामती लोकसभा निवडणुकीच्या रणभूमीत प्रचारात सक्रिय झाल्या आहेत. रेवती सुळे या पहिल्यांदाच प्रचारात दाखल झाली आहे. शरद पवार यांची नात आणि सुप्रिया सुळे यांची कन्या, असे राजकीय वलय असलेल्या रेवती सुळे यांच्या पदयात्रेने शहरात चर्चेचा विषय ठरला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी महायुतीशी सख्य जमवून सत्तेच्या सारीपाटावर विराजमान झाले. त्यामुळे बारामतीच्या राजकीय पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. शरद पवार आणि अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
अजित पवार यांच्याबरोबर आमदार दत्तात्रय भरणे, माजी आमदार रमेश थोरात आदी दिग्गज नेत्यांनी जाणे पसंत केले. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे या बॅकफूटवर आल्या होत्या. मात्र, शरद पवार यांनी राजकीय बेरीज जुळवून मतांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे.
अजित पवार हे महायुतीत सहभागी झाल्यानंतर बारामतीच्या लढतीकडे लक्ष वेधले होते. त्यात भाजपाने ही जागा अजित पवार यांच्या गटाला दिली. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच सुनेत्रा पवार यग्अर्ज भरलमहाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या यांच्यासाठी त्यांची मुलगी रेवती सुळे प्रचारात उतरली आहे.
बारामती शहरात सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळच्या सुमारास झालेल्या प्रचार रॅलीत रेवती सुळे यांच्यासह योगेंद्र पवार सहभागी झाले होते. रेवती सुळे ह्या पहिल्यांदाच प्रचारात उतरल्याने बारामती शहरात त्यांच्याविषयी चर्चा होती. या प्रचार फेरीला बारामतीकरांनी प्रतिसाद दिला.
बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवार कुटुंबाचा नेटाने प्रचार सुरू आहे. श्रीनिवास पवार, राजेंद्र पवार, रोहित पवार, योगेंद्र पवार, सुनंदा पवार यांच्यानंतर आता सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यादेखील प्रचारात उतरले आहेत. बारामती शहरातील मतदारांशी त्यांनी प्रचार फेरीच्या माध्यमातून संवाद साधला.
मतदान करण्याचे आवाहन देखील केले. शहरातील विविध गल्ल्या तसेच परिसरात त्यांनी प्रचार केला. राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट , काँग्रेस तसेच इतर मित्र पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते या प्रचार रॅलीत सहभागी झाले होते.
दोन ते अडीच तास ही रॅली सुरू होती. योगेंद्र पवार यांनी देखील मतदारांशी संवाद साधला. माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव, शिवसेनेचे राजेंद्र काळे, तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर युवक अध्यक्ष सत्यव्रत काळे , महिला अध्यक्ष वनिता बनकर, यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.





