Pimpri : चिखलीतील ‘त्या’ धोकादायक चढावर पुन्हा तीच दुर्घटना

चिखली : चिखलीतील धोकादायक चढावर पुन्हा एकदा अपघाताची पुनरावृत्ती झाली असून, नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. सोमवारी (दि. २५) सायंकाळी पाच वाजता ट्रकमधून लोखंडी सळ्या रस्त्यावर कोसळल्या. सुदैवाने ट्रकच्या मागे कोणतेही वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला.
याच ठिकाणी याआधीही अशा घटना घडल्या असून, वारंवार अपघात होत असूनही महापालिका स्थापत्य विभाग आणि पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष कायम आहे. एखाद्याचा बळी गेल्यावरच प्रशासन जागे होणार का? असा प्रश्न संतप्त नागरिक विचारत आहेत.
चिखली-कुदळवाडी रस्त्यावर अवजड वाहनांना पूर्ण बंदी घालावी, असा नागरिकांचा सातत्याने आग्रह आहे.
या परिसरात दाट नागरी वस्ती आहे. मोठमोठ्या शाळांमुळे विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे त्वरित उपाययोजना करण्याची गरज आहे. याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष प्रदीप आहेर म्हणाले की, या महिन्यात दोन अपघात झाल्याने महापालिका आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करून चढाची व उताराची तीव्रता कमी करावी.
तर राष्ट्रवादीचे युवा नेते विशाल आहेर म्हणाले की, या चढावर तीन नागरिकांचा मृत्यू झाला तरीही रुंदीकरणाचे काम रखडले आहे. महापालिकेने त्वरित पावले उचलावीत. नागरिकांच्या रोषामुळे प्रशासनावर दबाव वाढला असून, या धोकादायक चढावर तातडीच्या उपाययोजनेची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





