एम. डी. पाखरे/ज्ञानेश्वर फड
आळंदी, दि. 22 –
देव निवृत्ति यांनी
धरिले दोन्ही कर ।
जातो ज्ञानेश्वर समाधीसी ।।
नामा म्हणे आतां
लोपला दिनकर ।
बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ ।।
तीर्थक्षेत्र आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज यांचा आज 726वा संजीवन समाधी सोहळा हरिनाम गजरात, भक्तिमय वातावरणात पार पडला. परंपरेप्रमाणे संत नामदेव महाराज यांचे वंशज हभप नामदास महाराज यांचे माऊलींच्या समाधीसमोर वीणा मंडपात समाधी सोहळ्याचे कीर्तन होऊन पुष्पवृष्टी व गुलाल उधळून समाधी सोहळा साजरा झाला.
यावेळी नामदास महाराज यांनी माऊलींच्या समाधी सोहळ्याचा प्रसंग सांगताना श्रोते भाविक भक्तांचे डोळे पाणावले होते. नामदास महाराज म्हणाले, माऊलींना समाधिस्थ करण्यासाठी सर्व संत, देव, ऋषी-मुनी अलंकापुरीत आले होते. सर्वांनी ज्ञानेश्वर महाराज यांच्या निर्णयाला सुरुवातीला विरोध केला मात्र माऊली त्यांच्या निर्णयावर ठाम असल्याने अखेर त्यांना परवानगी दिली आणि ज्ञानदेव कार्तिक वद्य त्रयोदशीला समाधिस्थ झाले. घंटानाद, पुष्पवृष्टी आणि रसाळ कीर्तनाच्या श्रवणाने भाविकांना आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याची मंगळवारी अनुभूती घेतली. माऊली… माऊली… जयघोषाने अलंकापुरी दुमदुमून गेली होती. यावेळी माऊली मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.
समाधी सोहळा कीर्तनानंतर उपस्थित मान्यवर, मानकरी, सेवेकरी यांना संस्थानच्या वतीने नारळ प्रसाद देण्यात आला. यावेळी खासदार संजय जाधव, प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त विकास ढगे पाटील, पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, बाळासाहेब चोपदार, मानकरी बाळासाहेब कुऱ्हाडे, योगेश आरु, स्वप्निल कुऱ्हाडे, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर, माजी जिल्हाप्रमुख राम गावडे, माजी विरोधी पक्षनेते डी. डी. भोसले, सचिव अजित वडगावकर, मुख्याधिकारी अंकुश जाधव, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, माजी नगरसेवक सचिन गिलबिले, प्रशांत कुऱ्हाडे, ज्ञानेश्वर रायकर तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त माऊली मंदिरात पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रम सुरू होते. यावेळी पहाटे 3 ते 4 वेळेत माऊली देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांच्या हस्ते पवमान अभिषेक व दुधारती झाली. सकाळी 7 ते 9 ह. भ. प. हैबतबाबा आरफळकर यांच्या वतीने हैबतबाबा पायरीपुढे कीर्तन झाले. सकाळी 7. 30 ते 9. 30 वीणा मंडपात कीर्तन झाले. सकाळी 7 ते 9 दाणेवाले निकम दिंडी यांच्या वतीने भोजलिंगकाका मंडपात कीर्तन झाले. सकाळी 9 ते 11 तेथेच दुसरे कीर्तन झाले. सकाळी 10 ते दुपारी 12 ह. भ. प. नामदास महाराज यांचे संजीवन समाधी सोहळ्याचे कीर्तन झाले. सकाळी 9 ते 10 महाद्वारकाल्याचे कीर्तनानंतर हैबतबाबा दिंडीची समाधी मंदिरात प्रदक्षिणा झाली. दुपारी 12 ते 12. 30 माऊलींच्या 726 व्या संजीवन समाधी दिनानिमित्ताने घंटानाद, पुष्पवृष्टी, आरती व मान्यवरांना नारळप्रसाद वाटप करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी 6.30 ते 8. 30 हभप सोपानकाका देहूकर यांच्यावतीने कीर्तन सेवा पार पडली. रात्री 9. 30 ते 11. 30 श्री. हरिभाऊ बागडे यांच्या वतीने कारंजा मंडपात भजन सेवा संपन्न झाली.
संगीत महोत्सवाचे आयोजन
संत ज्ञानेश्वर महाराज यांचा समाधी सोहळा अलंकापुरीत सर्व धर्मशाळा, मठ, वारकरी आश्रमात हरिनाम गजरात साजरा करण्यात आला. माऊलींच्या समाधी सोहळ्यानिमित्त मरकळ रोड येथे वै. विठाबाई गोळे व वै. हरिभाऊ गोळे (दादा) यांच्या कृपाशीर्वादाने श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व कीर्तन आणि संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
माऊली मंदिरात आज होणारे कार्यक्रम
कार्तिक वद्य चतुर्दशीसह अमावस्या बुधवार (दि. 23) पहाटे 3 ते 5 पवमान अभिषेक व दुधारती. सकाळी 5 ते 11.30 भाविकांच्या महापूजा. दुपारी 12.30 ते 1 महानैवेद्य. दुपारी 4 ते 6 श्री मोझे यांच्यावतीने कीर्तन. रात्री 8 ते 8.30 धुपारती. रात्री 9.30 ते 12.30 श्रींचा छबीना. रात्री 12.30 शेजारती होईल.