नवी दिल्ली – राजधानीत सध्या खुल्या बाजारात कांद्याच्या दर काही प्रमाणात वाढले आहेत नागरिकांवरील ताण कमी करण्यासाठी राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघाने दिल्लीमध्ये 19 रुपये प्रति किलो या दराने कांदा उपलब्ध करण्यास सुरुवात केली आहे. सध्या खुल्या बाजारात कांद्याचा दर 25 ते 35 रुपये प्रति किलो आहे. याबद्दल नागरिकांनी असमाधान व्यक्त केल्यानंतर केंद्र सरकारने राखीव साठ्यातील कांदा दिल्लीकरांसाठी उपलब्ध केला आहे. सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार दिल्लीतील 16 ठिकाणी हा स्वस्त दरतील कांदा नागरिकांना उपलब्ध करण्यात आला आहे. नागरिकांनी या सवलतीचा फायदा घ्यावा असे सांगण्यात आले. हा कांदा केंद्र सरकारच्या यंत्रणांनी महाराष्ट्र आणि इतर ठिकाणाहून उपलब्ध केला असून तो शीतगृहामध्ये ठेवला होता. भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरने उपलब्ध केलेल्या तंत्रज्ञानामुळे कांद्याची साठवणूक शक्य होत आहे. हा कांदा चार महिन्यापासून साठवून ठेवला होता. सध्याच्या काळामध्ये कांद्याचा दर वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे केंद्र सरकारने कांद्याचा राखीव साठा तयार करण्याची मोहीम दहा वर्षापासून सुरू केली असून यामुळे कांद्याची दरवाढ झाल्यानंतर नागरिकांना स्वस्त कांदा उपलब्ध करता येतो. इतर शहरातील कांद्याच्या दराकडे सरकारचे लक्ष आहे आणि कांद्याचा दर वाढल्यानंतर हा कांदा उपलब्ध करण्यात येणार आहे. रब्बीचा कांदा उपलब्ध होईपर्यंत सरकारचे कांद्याच्या दराकडे बारीक लक्ष असणार असल्याचे सांगितले जाते. दरम्यान यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.