अवसरीकरांना डोकेदुखी ः प्रवाह एकीकडे अन् बांधकाम दुसरीकडेच
मंचर (पुणे)-आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी बुद्रुक येथील शिंदेमळा ओढ्यावरील साकव पूल गेल्या चार वर्षांपासून प्रत्येक पावसाळ्यात वाहून जात आहे. त्यामुळे पुलाच्या बांधकामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अवसरी बुद्रुक येथील शिंदे मळ्याजवळून वाहणाऱ्या ओढ्यावर चार वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या वतीने साकव पूल बांधण्यात आला होता. पूल तयार झाल्यावनंतर पहिल्याच पावसाने पुलाच्या पुढील भाग पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेला. तसेच रहिवाशांच्या घरात पाणी घुसले होते. ग्रामपंचायतच्या वतीने त्याठिकाणी सिमेंटचे पाइप टाकून रहिवाशांना रस्ता तयार करून देण्यात आला आहे. मात्र गेली चार वर्षे ओढ्याला पूर आल्यावर रस्ता वाहून जात आहे. सोमवारी (दि. 7) रात्री झालेल्या पावसाने साकव पुलावरील भरावा पुन्हा वाहून गेला.
पूल बनवताना प्रशासनाने पाण्याच्या प्रवाहाची दिशा लक्षात न घेता प्रवाह एका बाजूला व दुसऱ्या बाजूला पूल बांधल्यामुळे परिसरातील रहिवाशांना पावसाळ्यात येण्याजाण्याचे हाल होत आहे. विशेषतः शेतीमाल व दूध यांची वाहतूक करताना रहिवाशांना अडचण येत आहे. ग्रामपंचायत दरवर्षी रहिवाशांना त्रास होऊ नये म्हणून त्याठिकाणी टाकलेल्या पाइपवर मुरुम, भरावा टाकून रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध करून देत असते; मात्र या चुकीच्या पुलामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचून पाणी घरात घुसण्याचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने तात्काळ याची दखल घेऊन कायमस्वरुपी पूल बांधकाम करून गेली चार वर्षे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा द्यावा. अशी मागणी किशोर शिंदे, निखिल शिंदे यांनी केली आहे.
- या पुलाच्या कामाची चौकशी करून दोषी असणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी शिंदेमळ्यातील ग्रामस्थांनी आमच्याकडे केली आहे. या घटनेची माहिती घेऊन वरिष्ठांना कळविण्यात आले आहे.
-दीपक शिरसाट, ग्रामविकास अधिकारी