मुंबई – परदेशी संस्थागत गुंतवणूकदाराकडून शेअर बाजार आणि रोखे बाजारात विक्री वाढत असल्यामुळे परकीय चलन बाहेर जात आहे. भारत -अमेरिका व्यापार करार होण्याबाबत स्पष्ट संकेत मिळत नाहीत. आयात करणार्याकडून डॉलरची मागणी वाढत आहे. या कारणामुळे रुपयाचे घसरने चालूच आहे. मंगळवारी रुपयाचा भाव 23 पैशांनी कोसळून 91.01 रुपये प्रति डॉलर या निचांकी पातळीवर गेला. विशेष म्हणजे जगातील इतर सहा मुख्य चलनाच्या तुलनेत डॉलरचे मूल्य दर्शविणारा डॉलर इंडेक्स गेल्या महिन्यात कमी होऊन 98.23 अंकावर आला आहे. एक वेळ हा निर्देशांक 110 अंकावर गेला होता. मात्र तरीही केवळ रुपया डॉलरच्या तुलनेत कोसळत आहे. जागतिक अनिश्चित परिस्थितीमुळे खनिज तेलाचे दर घसरून 59 डॉलरवर आले आहेत. भारत खनिज तेल आयातीसाठी मोठ्या प्रमाणात डॉलर खर्च करतो. खनिज तेलाच्या किमती कमी होऊनही डॉलरची मागणी वाढत असल्यामुळे रुपयाच्या मूल्यावर नकारात्मक परिणाम होत आहे. दहा दिवसापूर्वी रुपयाचा भाव 90 रुपये प्रति डॉलर होता. तो आता 91 रुपये प्रति डॉलर पेक्षा जास्त कमी झाला आहे. गेल्या पाच सत्रामध्ये रुपयाचा भाव एक टक्क्याने कमी झाला आहे. हा सरकारच्या दृष्टिकोनातून चिंतेचा विषय होऊ लागला असल्याचे दिसून येते. रुपया 92 रुपये प्रति डॉलर ही पातळी या महिन्यात ओलांडेल असे काही विश्लेषकांनी सुचित केले. काही विश्लेषकांनी सांगितले की, व्यापार कराराबाबत भारताने अमेरिकेपुढे सादर केलेला प्रस्ताव अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाकारला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जोपर्यंत भारत नवीन प्रस्ताव सादर करत नाही तोपर्यंत भारत -अमेरिका व्यापार करार होण्याची शक्यता कमी आहे. यासाठी वेळ लागणार असल्यामुळे आयातदारांनी डॉलरची मागणी वाढविली आहे. आता रिझर्व बँकेला डॉलरचे मूल्य स्थिर करण्यासाठी काही नावीन्यपूर्ण उपाययोजनावर विचार करावा लागणार असल्याचे दिसून येते. सरकारनेही या घटनाक्रमाची दखल घेऊन आयात- निर्यातीवर लक्ष ठेवण्यासाठी आंतर मंत्रालय गटाची स्थापना केली आहे.