Dollar Vs Rupee: आज पुन्हा रुपया कोसळला; आता एक डाॅलर म्हणजे किती रुपये पहा-

मुंबई – आज सोमवारी (दि. 27) शेअर बाजार निर्देशांकात एक टक्का घट झाली. त्यामुळे भारतीय रुपयाच्या मूल्यावर दबाव आला. अशा परिस्थितीत रुपयाचे मूल्य अकरा पैशांनी घसरून 86 रुपये 33 पैसे प्रति डाॅलर या पातळीवर गेले होते. चलन बाजारातील व्यापार्यांनी सांगितले की, डोनाल्ड ट्रम्प अनेक विषयावर अनाकलनीय वक्तव्य करत आहेत. त्यामुळे जागतिक शेअर बाजाराबरोबरच चलन बाजारावर याचा नकारात्मक परिणाम होत आहे.
ट्रम्प यांनी कोलंबीयावर पंचवीस टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आज तो निर्णय पुन्हा बदलला. यामुळे जागतिक शेअर बाजार व चलन बाजारावर याचा परिणाम झाला असल्याचे दिसून येते.
दरम्यान खनिज तेलाच्या किमती माफक पातळीवर आहेत. त्यामुळे रुपयाची जास्त हानी झाली नाही. बुधवारी अमेरिकेचे पतधोरण जाहीर होणार आहे. त्याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असल्याचे सांगितले जाते. दरम्यान परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची विक्री चालूच असून शुक्रवारी या गुंतवणूकदारांनी 2, 756 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. याचाही रुपयाच्या मूल्यावर परिणाम होत आहे.




