मुंबई – जगातील इतर मुख्य सहा चलनाच्या तुलनेत डॉलरचे मूल्य वेगाने कमी होत आहे. पुढील आठवड्यात फेडरल रिझर्व व्याजदरात पाव टक्क्याची कपात करणार असल्यामुळे डॉलर कमकुवत होत आहे. मात्र या कमकुवत होत असलेल्या डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य मात्र कमी होत असल्याचे दिसून येते. सोमवारी रुपयाचा भाव डॉलरच्या तुलनेत 44 पैशांनी घसरून 90.09 रुपये प्रति डॉलर या पातळीवर गेला. रुपया घसरत असल्यामुळे खनिज तेल आयात महागात पडणार आहे. परदेशी संस्थागत गुंतवणूकदार शेअर आणि रोखे बाजारातून गुंतवणूक काढून घेत आहेत. त्यामुळे रुपयाच्या मूल्यावर दबाव घेत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात रिझर्व बँकेने काही प्रमाणात हस्तक्षेप केला असल्याचे बोलले जात आहे. सोमवारी मात्र हा हस्तक्षेप टाळला असल्याचे दिसून येते. 2025 मध्ये आतापर्यंत रुपयाचे मूल्य पाच टक्क्यांनी कमी झाले आहे. मात्र अर्थ मंत्रालय किंवा रिझर्व बँक रुपयाचे मूल्य विशिष्ट पातळीवर असावे यासाठी प्रयत्न करत नसल्याचे सांगण्यात आले आहे. अमेरिकेने भारताविरोधात लावलेल्या 50% आयात शल्कामुळे भारताची निर्यात कमी झाली आहे. त्याचबरोबर अमेरिकेने चीनसह इतर अनेक देशात विरोधात आयात शुल्क लावल्यामुळे संबंधित देश निर्यात वाढविण्यासाठी स्वतःच्या चलनाचे अवमूल्यन होऊ देत असल्याचे दिसून येते. चीन पूर्वीपासूनच आपले चलन कमी पातळीवर ठेवून निर्यात वाढवीत आहे. अशा परिस्थितीत भारतीय रुपयाचे आणखी तीन टक्के अवमूल्यन झाले तरी त्याकडे दुर्लक्ष करण्याचे सरकारने ठरविले असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान रुपया कमकुवत होत असल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा डॉलरमधील नफा गेल्या वर्षात बराच कमी झाला आहे. अशा परिस्थितीत हे गुंतवणूकदार आपली गुंतवणूक काढून घेत असून शुक्रवारी या गुंतवणूकदारांनी 438 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली.