सातारा न्यायालयात येण्या-जाण्याचा मार्ग झाला निश्‍चित

सातारा – प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात एकदातरी न्यायालयाची पायरी चढावी लागते, अशी जुनी म्हण आहे. परंतु सध्या वाढत्या लोकसंख्या व क्षणात येणारे राग यामुळे खटल्यांची संख्या दसपटीने वाढली आहे. त्यामुळे अनेकांना न्यायालयात यावे लागते. सातारा न्यायालयात पूर्वी दोन्ही बाजूने येण्याजाण्याचे मार्ग होते. परंतु सन्माननीय जिल्हा न्यायाधीश राजेंद्र सावंत यांच्या सुचनेनुसार 16 वर्षाने न्यायालयात आत व बाहेर जाण्याचे मार्ग निश्‍चित झाले आहेत. त्याचे सर्वत्र स्वागत होत आहे.

पूर्वी सातारा शहरातील राजवाडा याठिकाणी सातारा जिल्हा न्यायालयाचे कामकाज केले जात होते. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात वर्दळ होती. तसेच कोरेगाव, माण, खटाव व इतर ठिकाणाहून येणाऱ्या लोकांना बसस्थानकापासून पुन्हा राजवाड्याकडे जावे लागत होते. अखेर सातारा जिल्हा सत्र न्यायालयाची इमारत सातारा कोरेगाव रस्त्यावरील सदरबझार हद्दीत नवीन इमारत बांधण्यासाठी दि. 20 मार्च 1996 रोजी तात्कालीन उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री मनहरलाल भिकालाल शहा यांच्या हस्ते भूमीपुजन व कोनशिला समारंभ झाला होता. त्यानंतर सात वर्षाने म्हणजे 2 एप्रिल 2003 रोजी तात्कालीन उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सी. के. ठाकूर यांच्या हस्ते नूतन इमारतीचे उद्‌घाटन झाले होते. तेव्हापासून न्यायालयाच्या दोन्ही प्रवेशद्वारातून पक्षकार, वकील, कर्मचारी, न्यायाधीश, पोलीस, साक्षीदार, आरोपीं यांना प्रवेश देण्यात येत होता.

परंतु आता न्यायालयाच्या उजव्या बाजूला प्रवेश म्हणजे आत येण्यासाठी व बांधकाम भवनच्या डाव्या बाजूला बाहेर जाण्यासाठी मार्ग निश्‍चित केले आहेत. गेले दोन दिवसांपासून कर्मचारी व पोलीस यंत्रणा यासाठी लोकांना विनंती करत आहे. सध्या सहाय्यक फौजदार डी. एस. मोरे, दीपक जाधव, व्ही. बी. ढमाळ, विजय जाधव, ढापते, शिंदे हे पोलीस कर्मचारी तसेच न्यायालयाचे कर्मचारीसुध्दा सकाळी व सायंकाळी प्रवेशद्वाराजवळ उभे राहून सुचना करू लागले आहेत. दोन्ही मार्ग वेगळे केल्यामुळे काहीवेळेला होणारे किरकोळ अपघात यामुळे थांबले असून अनेकांना आता ये जा करणे सोयीचे झाले आहे. त्यामुळे अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. सध्या वकील मंडळींचा कोल्हापूर खंडपीठासाठी संप असल्यामुळे बिचाऱ्या कनिष्ठ वकीलांना इतर किरकोळ काम करताना न्यायालयात यावे लागते. त्यांना दोन दिवस न्यायालयात जाताना वळसा मारावा लागला. आता मात्र सर्वजण व्यवस्थित आत व बाहेर जाण्याचा मार्ग स्वीकारू लागले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.