प्रभात वृत्तसेवा हिंजवडी – हिंजवडी माण रस्त्यातील अनधिकृत बांधकामांना पुणे महानगर विकास प्राधिकरणाने ( पीएमआरडीए) पांडवनगर ते राक्षे वस्तीपर्यत नोटीस बजावल्यानंतर अनेकांनी आपली पत्राशेड व दुकाने काढून घेतली. माणच्या गावठाणालगतच्या अनधिकृत बांधकामांना नोटीस न देता थेट 36 मीटर रुंदीकरणाच्या खुणा ( डीमार्केशन ) करण्यास सुरुवात केल्याने संभ्रमात पडलेल्या ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना विचारणा केली असता थेट पोलीस बळाचा वापर करून जाब विचारणऱ्यांना उचलण्यात आल्याने माणमध्ये काही काळ तणावाचे वातावरण होते. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आयटी परिसरात प्रशस्त रस्ते करण्याच्या सूचना दिल्यानंतर प्रशासन अॅक्शन मोडवर आले असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या माण रस्ता रुंदीकरणासाठी मार्किंग करण्यात येत आहे. त्याला काही नागरिकांनी विरोध केला. गावठाण हद्दीलगतच्या भागात हा रस्ता 18 किंवा 24 मीटर करण्यासाठी ग्रामस्थ व ग्रामपंचायत आग्रही होती. याबाबतचा पत्रव्यवहार देखील ग्रामपंचायतच्या वतीने अजित पवार व पीएमआरडीएच्या आयुक्तांना दिले होते. मात्र सर्व रस्ते विकास आराखड्यात टाकल्या प्रमाणेच होतील. ” तुम्ही काय सांगायचे ते सांगा मी जे काही करायचे ते करीनच” अशी भूमिका घेत अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे प्रशस्त रस्ते करण्याची भूमिका घेतल्याने ग्रामस्थांमध्ये काही प्रमाणात नाराजीचा सूर पाहायला मिळाला.प्रस्तावित 36 मीटर रुंदीकरणात अनेकांची जुनी कच्ची व पक्की बांधकामे बाधित होत असल्याने काहींवर बेघर होण्याची नामुष्की येणार आहे. तर काहींची दुकाने पत्राशेड तोडली जाणार असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे जुन्या पंधरा वीस वर्षांपूर्वी च्या बांधकामांना शासन काय मोबदला देणार याबाबत ग्रामस्थ अनभिज्ञ आहेत. दादा बोले अन दल हाले.. “रस्त्याच्या कामात आडवा येणाऱ्याला उचला .कामात अडथळा आणणाऱ्यावर थेट 353 प्रमाणे गुन्हे दाखल करा “असा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पाहणी दौऱ्यादरम्यान दिला होता. त्यानुसार पोलीस प्रशासन कामाला लागले असून हद्दी खुणांचा जाब विचारण्यास गेलेल्या तरुणांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. काही काळानंतर त्यांना सोडूनही देण्यात आले.परंतु “दादा बोले अन दल हाले ” अशी चर्चा माण ग्रामस्थामध्ये सुरू होती. दोन अडीच तास चक्का जाम.. रस्ता रुंदीकरणाच्या हद्दी खुणा दाखविण्यासाठी प्रशासन रस्त्यावर उतरले असताना माण मध्ये दोन्ही बाजूनी चक्का जाम झाल्याचे पाहायला मिळाले. आयटीतील कंपन्या सुटण्याच्या कालावधीत हे मोजणीचे काम सुरू असल्याने सायंकाळपर्यत लांबच्या लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. हिंजवडीकडून माण कडे येणाऱ्या रस्त्यांवर तब्बल दोन तास चक्का जाम झाल्याचे पाहायला मिळाले.