रोकेम कचरा प्रकल्पाला आग लागली की लावली

कारण अस्पष्ट; गेल्या दोन वर्षांतील दुसरी घटना
पालिकेच्या प्रकल्पात दहा वर्षांपासून पूर्ण क्षमतेने काम नाही
हडपसर – रामटेकडी येथील वीज निर्मिती करण्यासाठी महानगरपालिकेकडून उभारण्यात आलेल्या रोकेम प्रकल्पात आज दुपारी चारच्या सुमारास आग लागली. ही आग एका तासात विझविण्यात आली असली तरी आगीचे कारण समजू शकले नाही. या प्रकल्पात दोन वर्षातील आगीची ही दुसरी घटना आहे. 2010 पासून एकही दिवस येथे वीजनिर्मिती झाली नसल्याने पालिकेने यंत्रणेला कारणे दाखवा नोटीस दिल्यानेच आग लावण्याचा कट करण्यात आला असल्याचा आरोप नगरसेवक योगेश ससाणे यांनी केला आहे.
रामटेकडी येथील प्रकल्पाची 750 टनाची क्षमता आहे. मात्र, तेथे दररोज 350 टन कचऱ्यावरच प्रक्रिया होत असते, त्यामुळे आतापर्यत दोन वेळा प्रशासनाने या प्रकल्पाला नोटीस दिली आहे. मनपा अतिरिक्त आयुक्तांनी गेल्या महिन्यातही कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे ही आग नक्की लागली की लावली, अशी शंका नगरसेवक योगेश ससाणे यांनी उपस्थित केली आहे.
उरूळी देवाची-फुरसुंगी येथील ग्रामस्थांचे कचरा डेपो संदर्भात आंदोलन सध्या सुरु आहे. तेथे कचऱ्याच्या गाड्या येऊ देत नाहीत. त्यामुळे कचरा टाकण्यासाठी पूर्वीच्या प्रकल्प जागेचा वापर पालिका करीत आहे. येथे 16 ऑगस्टपासून सुमारे 60 हजार टन कचऱ्याचे ओपन डम्पिंग केलेले आहे. मात्र, तेथे शेड व मोठे कंपाऊड असल्याने येथील नागरिकांच्या लक्षात ते आलेले नाही.
याच प्रकारातून दोन दिवसांपासून रोकेम प्रकल्पाकडे येणाऱ्या कचरा गाड्याही अडविल्याचे प्रकार घडले आहेत. आज, सकाळी नगरसेवक योगेश ससाणे व हिल साईड सोसायटीच्या नागरिकांनीही मनपाच्या कचराच्या गाड्या माघारी पाठवल्या होत्या. सदर प्रकल्पावरील कारवाई टाळण्यासाठीच ही आग लावण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रकल्प बंदच करा…
पुणे महानगरपालिकेने बेकायदेशीरपणे कचऱ्याचे डंम्पींग बंद करावे. उद्योजक व कामगारांना दुर्गंधीचा त्रास होत आहे, अशी मागणी रामटेकडी औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांनीही केलेली आहे. रामटेकडी औद्योगिक वसाहत असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद चिंतामण डबीर, उपाध्यक्ष विकास साहेबराव जगताप, खजिनदार किशोर पंढरीनाथ शिंदे, सचिव बालाजी ईश्वर माने याबाबत महानगरपालिका तसेच राज्य शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत.





