राजगुरूनगर -शहरातील अनेक रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे. शहरातील बच्चे पाटील कॉलनीमधील रस्त्याचे काम मंजूर झाले आहे. त्या कामाला मार्च महिन्यात सुरुवात होणार होती. मात्र, करोनाचे संकट उभे राहिले अन् काम थांबले. दरम्यान, नगरपरिषदेने या रस्त्यावर खोदाई केली त्या अगोदर शहरात पाणी योजना पाइप टाकण्यासाठी रस्ते खोदण्यात आले होते. मात्र, त्याची दुरुस्ती करण्यात न आल्याने शहरात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. हा रस्ता कॉंक्रीट करण्याची नागरिकांची मागणी असून केवळ रस्ता उकरून ठेवण्यात आला आहे. मार्चपासून कॉंक्रिटीकरणाचे सुरू झालेले काम बंद आहे. पहिले पाण्याच्या लाइनसाठी एकदा खोदकाम झाल्यानंतर सांडपाणी आऊटलेट पास करण्यासाठी पाइपलाइनचे काम यामुळे सलग दोन वर्षे नागरिक त्रास सहन करीत आहेत. या रस्त्याचे काम लवकर करावे अथवा रस्त्यावर पुन्हा मुरूम टाकावा, अशी नागरिक मागणी करीत आहेत. सध्या पाऊस पडत असल्याने शहरातील अनेक रस्त्यांवर राडारोडा पसरला आहे, त्यातून कसेबसे मार्ग काढत जावे लागत आहे. त्यातच रस्त्यावरून एखादे वाहन गेल्यास हा राडारोडा पायी चालणाऱ्यांच्या अंगावर उडत असल्याने नागरिकांची कुंचबणा होत आहे. तर दुचाकीचालक घसरूनही पडले आहेत. तरीही प्रशासनाकडून तो चिखल दूर केला जात नाही की त्यावर काही उपाययोजना केल्या जात नाहीत. एखादा बळी गेल्यावरच जाग येणार आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.