पुणे जिल्हा | रस्ताप्रश्नी सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्याला काळे फासले

वेल्हे, (वार्ताहर) – १८ गाव मावळ भागातील तरुणांनी या रस्त्याबाबत सतत तक्रारी केल्या होत्या. त्याकडे दुर्लक्ष केल्याने स्थानिक तरुणांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता साईप्रसाद मुंगीलवार यांना काळे फासले व आपला संताप व्यक्त केला.
सतत पडत असलेल्या पावसामुळे राजगड तालुक्यातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढू लागले आहे. वारंवार तक्रारी करून सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीच दखल घेतली नाही. खड्डेमय रस्त्यांमुळे स्थानिक नागरिकांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
या संदर्भात दैनिक प्रभातमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता साईप्रसाद मुंगीलवार व माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद देशमाने यांनी रस्त्यांची पाहणी केली. रस्ता दुरुस्तीसंदर्भात उपाययोजना सुचवून तातडीने खड्डे बुजवण्यास व गटर लाईन काढण्यास सांगितले.
तर १८ गाव मावळ भागातील तरुणांनी या रस्त्याबाबत सतत तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे स्थानिक तरुणांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता साईप्रसाद मुंगीलवार यांना काळे फासले व आपला संताप व्यक्त केला. या प्रकाराच्या विरोधात साईप्रसाद मुंगीलवार यांनी वेल्हे पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

