अंत्यसंस्कार करण्यासाठी पार करावी लागते नदी; मराठवाड्याच्या ‘या’ गावचे विदारक चित्र समोर

मुंबई : राज्यभरात अनेक शहरं अशी आहेत की जिथे पायाभूत सुविधांचा अजूनही अभाव आहे. ग्रामीण भाग तर या सुविधेपासून किती तरी कोस दूर आहे. खराब रस्त्यामुळे अनेकांचे जीव गेल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील पण जिवंतपणी जे हाल होतात तेच हाल मृत्यूनंतर देखील या रस्त्यामुळे झाल्याचे एका व्हिडीओतून समोर आले आहे. परभणी जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे लोकांवर अंत्यसंस्कारासाठी काय हाल सोसावे लागतात त्याचे विदारक चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे.
परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात चारठाणा गावातील एका मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्याासठी गावकऱ्यांना स्वत:चा जीव धोक्यात घालण्याची वेळ आली आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चारठाणा याठिकाणी मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नदीमधून प्रेताला घेऊन जाण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
जिंतूर तालुक्यातील चारठाणा या गावातील ही घटना आहे. या गावात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याला नदीच्या पलीकडे नेऊन अंत्यसंस्कार करावे लागतात. पावसात अशी एखादी दुर्दैवी घटना घडली तर या गावकऱ्यांनाच जीव धोक्यात घालून हे विधी पार पाडावे लागतात.
पावसाळ्यात पाणी भरलेल्या नदी मधूनच प्रेताला घेऊन जाण्याची वेळ नागरिकांवर येते. याविषयी प्रशासन आणि लोकप्रतिनिधीकडे वारंवार विनंती करूनही मागील अनेक वर्षांपासून यामध्ये कोणताही बदल झालेला नाही.





