चिंचवड : पिंपरी चिंचवडसारख्या विकसित औद्योगिक शहरातही अजूनही नियमित, स्वच्छ आणि शाश्वत पाणीपुरवठा ही सामान्यांची दूरची गोष्ट झाली आहे. एक दिवसांआड येणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांनी घराबाहेर बॅरल, ड्रम, बादल्या ठेवून पाणी साठवण्याची सवय अंगीकारली आहे. मात्र, हीच बॅरल संस्कृती आता डेंगी आणि मलेरियाच्या डासांना खुले आमंत्रण देत आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे. एक दिवसाआड पाणी येत असल्याने शहरातील बहुतांश झोपडपट्ट्यांमध्ये पाण्याची तुटवडा कायम आहे. दिवसभर २४ तास वाहनारे सार्वजनिक नळ बंद झाल्याने लोकांना घराबाहेर उघड्यावर पाणी साठवावे लागते. परिणामी एका कुटुंबाजवळ किमान दोन ते चार बॅरल्स आढळतात. झोपडपट्ट्यांमधील ८५ टक्क्यांहून अधिक घरांमध्ये ही स्थिती असून, या बॅरल्समध्ये स्वच्छ पाणी साठवल्यामुळे डेंगीचे डास सहज तयार होतात. डेंगीचा डास कसा तयार होतो? स्वच्छ पाण्यात डेंगीचा डास अंडी घालतो. तीन दिवसांत त्यातून अळ्या तयार होऊन सहा दिवसांत पूर्ण डास बाहेर पडतो. बॅरल्स, कुलर, फ्रिजच्या मागील पाणी, प्लास्टिकच्या बाटल्या, टाक्या हे सर्व त्यासाठी उत्तम स्रोत ठरतात. शहरात दरवर्षी पावसाळ्यात डेंगी आणि मलेरियाचे रुग्ण वाढत असतात. यंदाही त्याला अपवाद नाही. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांना कोरडा दिवस पाळण्याचे, पाणी झाकून ठेवण्याचे आणि उघड्या पाण्यात खोबरेलतेल टाकण्याचे आवाहन केले आहे. महापालिकेच्या वतीने आता आणखी जोरदारपणे जनजागृती मोहीम सुरू केली जाणार आहे. पाण्याच्या साठवणुकीशिवाय पर्याय नाही! विकासनगर, दिघी, चिखली, मोशी, भोसरी, वाकड, काळेवाडी, सांगवी, ताथवडे आणि पिंपरी आदी भागांतील नागरिक वर्षानुवर्षे पाण्याच्या समस्येने त्रस्त आहेत. दरवेळी टँकरच्या आशेवर जीव मुठीत धरून जगणाऱ्या या नागरिकांसाठी ‘स्मार्ट सिटी’ ही फक्त नावापुरती योजना ठरत आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याची साठवणूक करण्याशिवाय पर्याय नाही पिंपरी चिंचवड महापालिकेच्या म्हणण्यानुसार नागरिकांनी कोरडे दिवस पाळले तर डेंगी नियंत्रित करता येईल. पण त्यासाठी नियमित पाणीपुरवठा करणे सध्यातरी पाणी पुरवठा विभागाला शक्य नाही. पाणीपुरवठ्याची शाश्वती आणि आरोग्याचा सुरक्षित अधिकार मिळण्यासाठी नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर तातडीने उपाययोजना करणे हेच प्रशासनाचे खरे कर्तव्य ठरावे! मच्छरांमुळे निर्माण होतात या समस्या मच्छरांच्या वाढीमुळे डेंगी, मलेरिया, चिकनगुनिया यांसारखे आजार वाढतात. लहान मुले, वृद्ध आणि महिलांना याचा अधिक धोका असतो. मच्छरांमुळे झोपमोड, चिडचिड व थकवा जाणवतो. कामावर परिणाम होतो. घरातील व सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता वाढते. साचलेल्या पाण्यात मच्छरांची पैदास होते. उपाय न केल्यास रोगराई पसरते. आरोग्यावर ताण येतो आणि आर्थिक खर्चही वाढतो. त्यामुळे मच्छर निर्मूलनासाठी योग्य खबरदारी आवश्यक आहे. ही आहेत मच्छर वाढण्याची कारणे विस्कळित पाणीपुरवठ्याने वाढते संकट घरासमोर बॅरल्सची गर्दी वाढली बॅरल्समध्ये डेंगीच्या अळ्या निर्माण झोपडपट्ट्यांमध्ये पाण्याचा गंभीर तुटवडा सतत वाहनारे सार्वजनिक नळ बंद आरोग्य विभागाकडून जनजागृती सुरू नियमित पाणीपुरवठ्यावरच उपाय शक्य या उपाययोजना करा घरातील साठलेले पाणी काढा. पाण्याची भांडी झाकून ठेवा. आठवड्यातून कोरडा दिवस पाळा. कुलरमधील पाणी दररोज बदला. खोबरेल तेल पाण्यावर टाका. खिडक्यांना जाळी बसवा आवश्यक. मच्छरदाणीचा नियमित वापर करा.