टॅंकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना द्यावेत

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले : जिल्ह्यात पाण्याची तीव्र टंचाई

सातारा –
सातारा व जावली तालुक्‍यातील टंचाईग्रस्त भागात तातडीने पाणी टॅंकर पाठवण्यात यावे. दुष्काळी भागाची मदत ही लाल कारभाराच्या फितीत अडकून पडू नये त्यासाठी टॅंकर मंजुरीचे तातडीचे अधिकार तहसीलदारांना देण्यात यावेत अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली.

स्व. अभयसिंहराजे भोसले यांच्या 75 व्या जयंतीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेनंतर शिवेंद्रराजे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत त्यांना छेडले असता ते म्हणाले गतवर्षी दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा बॅंकेच्यावतीने एक कोटी रुपयांची मदत देण्यात आली होती. यंदा सुध्दा जिल्हयात पाण्याची तीव्र टंचाई आहे. सातारा व जावली तालुक्‍यात एक तृतीयांश भाग हा डोंगर भागांमध्ये वसला आहे. येथील वाडया वस्त्यांना डोंगराच्या झऱ्यांचाच आधार आहे. मात्र टॅंकर मंजूरीची प्रक्रिया ही प्रचंड वेळखाऊ आहे.

आधी तलाठ्यांचे पंचनामे, तहसीलदारांकडून प्रांतांच्या स्वाक्षरीने जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल मग टॅंकर मंजूरी आणि मग पुन्हा प्रत्यक्ष वाटप यामध्ये बराच वेळ खर्ची पडून टंचाईग्रस्त भागांची तहान भागत नाही. त्यामुळे विभागनिहाय आढावा घेऊन तहसीलदारांनाच प्रत्यक्ष टॅंकर मंजूरीचे आदेश द्यावेत अशी मागणी शिवेंद्रराजे भोसले यांनी केली. सातारा शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नळ कनेक्‍शन देताना ग्राहकांकडून जी अनामत घेते त्या संदर्भात शिवेंद्रराजे यांनी आवाज उठवला होता त्या प्रश्‍नाची आठवणं केली असता बाबा राजे म्हणाले, ठोस निर्णय घेण्याची इच्छाशक्‍ती येथील कार्यकारी अभियंत्यामध्ये नाही. त्यांचा सारा कारभार पुण्यावरून चालतो. अनामत घेणे व देणे या सोप्या प्रक्रिया अत्यंत किचकट करून ठेवल्या आहेत.

पूर्णवेळ व अभ्यासू अभियंता साताऱ्याला मिळू नये ही शोकांतिका आहे. अधिवेशनामध्ये या संदर्भात आवाज उठवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ठेकेदारांचा वाढता हस्तक्षेप होतोय अशी माहिती पत्रकारांनी पुरवल्यावर असे असेल तर ती गंभीर बाब असल्याचे शिवेंद्रराजे यांनी नमूद केले. साताऱ्यातील चंद्रविलासच्या मिसळीचा झटका व उदयनराजे भोसले यांना मिळणारे संभाव्य मताधिक्‍य या प्रश्‍नांना शिवेंद्रराजे यांनी खुबीने टाळले, मी आपले त्यादिवशी पोहे खालले असे सांगून शिवेंद्रराजे यांनी नर्मविनोदी शैलीत स्वतःची सुटका केली. उदयनराजेंच्या मताधिक्‍याबाबतही त्यांनी बोलणे टाळले. मनोमिलना विषयी बोलताना ते म्हणाले थोरल्या पवारांचा आदेश मानूनच लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार केला. पालिकेत आमचे बाराच नगरसेवक आहेत. येथील मनोमिलनाच्या संदर्भात अद्याप कोणतीही भूमिका ठरवण्यात आलेले नाही असे त्यांनी रोखठोक शैलीत सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.