प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिकेच्या रस्ते, मलवाहिन्या, पावसाळी गटारे आणि इमारतींच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी आता मुख्य खात्याऐवजी थेट क्षेत्रीय कार्यालयांना दिली जाणार आहे. त्यामुळे मुख्य खात्यांवरील ताण कमी होणार असून स्थानिक पातळीवरील कामांना गती येणार आहे. या प्रस्तावावर आज स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा झाली.अंतिम निर्णय पुढील आठवड्यात घेतला जाणार आहे.महापालिका निवडणूक रखडली आहे. त्यामुळे प्रभागांसाठी स्थानिक पातळीवर नगरसेवक नाहीत, अशा वेळी परिसरातील कामांसाठी नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर क्षेत्रीय कार्यालय मुख्य खात्यांच्या वादत ही कामे केली जात नाहीत. ही बाब लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेत सध्या मुख्य खाते आणि १५ क्षेत्रीय कार्यालये या दोन स्तरांवर कामे चालतात. यामध्ये अधिकार आणि जबाबदारीवरून नेहमीच गोंधळ होतो. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. त्यामुळे कामांचे विकेंद्रीकरण करून दैनंदिन देखभाल कामांची जबाबदारी थेट क्षेत्रीय कार्यालयांकडे दिली जाण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. आयुक्त नवल किशोर राम यांनी आज विभाग प्रमुखांशी बैठक घेऊन यावर प्राथमिक चर्चा केली.क्षेत्रीय कार्यालयांवर शहरात १२ मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांची जबाबदारी असूनही अनेकदा मुख्य खात्याशी समन्वयाचा अभाव जाणवतो. त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे वेळेवर भरले जात नाहीत. तसाच प्रकार सांडपाणी वाहिन्यांच्या देखभालीतही दिसून येतो. यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत.आता, आयुक्तांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की, पथ, मलनिःसारण, भवन आदी विभागातील देखभाल कामे आणि त्यासाठीचा निधी क्षेत्रीय कार्यालयांना द्यावा. तर मुख्य खात्यांनी नवीन भांडवली प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करावे. त्यामुळे कामांची गुणवत्ता आणि वेग वाढेल, असा प्रशासनाचा विश्वास आहे.मुख्य खात्यांकडून कामे हस्तांतरित करताना मनुष्यबळ, निधी आणि जबाबदाऱ्या कशा वाटायच्या, यावर लवकरच अतिरिक्त आयुक्त पातळीवर चर्चा होणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय आयुक्तांकडून जाहीर केला जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.