परिस्थिती रामभरोसे : गलथान कारभाराचा नमुना करोना अहवाल येण्यास लागत आहेत पाच-पाच दिवस पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने गलथान कारभाराचा कळस गाठला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांचा जीव आता रामभरोसे आहे. रुपीनगर तळवडे येथील एका महिलेने 1 सप्टेंबर रोजी यमुनानगर रुग्णालयात अँटीजेन आणि आरटीपीसीआर चाचणी केली. अँटीजेनचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर महिलेला घरी सोडले. दहा दिवसांनंतरही आरटीपीसीआरचा अहवाल आला नाही. त्रास होऊ लागल्याने तीन दिवसांपूर्वी महिलेला वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान शुक्रवारी महिलेचा मृत्यू झाला. अहवाल येण्यापूर्वीच रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापुढे निष्क्रियतेचा कळस गाठत मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी रुग्णाच्या नातेवाइकांना फोन आला की “तुमच्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, त्यांना न्यायला येऊ का?’ यामुळे नातेवाइकांनी संताप व्यक्त केला आहे. करोना रोखण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरल्याचा संताप नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. नागरिकांना पाच-पाच दिवस अहवाल पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे देखील सांगितले जात नाही. परिणामी ऐनवेळी त्रास होऊ लागल्यावर रुग्णांची धावपळ होते. त्यामुळे मृतांची संख्या वाढत आहे. रुपीनगर तळवडे येथील रहिवासी कमल पांडुरंग धुकटे ( वय 59) यांनी 1 सप्टेंबर रोजी पालिकेच्या यमुनानगर येथील रुग्णालयात अँटीजेन आणि आरटीपीसीआर चाचणी केली. अँटीजेनचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडले. दहा दिवसांनंतरही आरटीपीसीआरचा अहवाल आला नाही. त्रास होऊ लागल्याने त्यांना बुधवारी (दि.9) वायसीएम रुग्णालयात दाखल केले होते. तरी देखील त्यांचे अहवाल आले नव्हते. त्यांचा अहवाल निगेटिव्ह की पॉझिटिव्ह माहिती नसताना उपचारादरम्यान शुक्रवारी (दि.11) सकाळी त्यांचा मृत्यू झाला. करोनाचा अहवाल दहा दिवसानंतरही आला नाही. मृत्यू झाल्यानंतर 24 तासाने अहवाल आला. त्यानंतर आज पालिका प्रशासनाकडून फोन आला की तुमच्या आईचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहेत. त्यांना घ्यायला येऊ का? प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे एका महिलेचा जीव गेला आहे. आरटीपीसीआरचा अहवाल सात ते दहा दिवस येत नाहीत. अहवाल येईपर्यंत नागरिक बाहेर फिरतात. त्यामुळे त्यांच्याकडून प्रसार होऊ शकतो. पालिकेकडून एखादा निगेटिव्ह आल्यानंतर सांगितले देखील जात नाही. पालिकेने रिपोर्ट निगेटिव्ह आला तरी संबधितांना सांगणे गरजेचे आहे. धुकडे यांच्या मृत्यूला प्रशासनाचा निष्क्रियपणा कारणीभूत आहे. – मनीष भालेकर, रहिवाशी रुपीनगर