शिरूर -करोना व्हायरसचा प्रादुर्भाव, घराची ओढ लागलेले परप्रांतीयांना शिरूर आगाराने त्यांच्या कुटुंबापर्यंत सोडण्याचे काम केले आहे. एसटी चालक शेकडो किलोमीटर एसटी चालवताना भूकही विसरलेले आहेत. मध्यप्रदेशात 88 एसटी बसेस, छत्तीसगड येथे 93 अशा एकूण 181 एसटी बसेस व 362 बसचालकांनी हे काम केले आहे. त्यांनी मध्यप्रदेश सीमेपर्यंत आकरली गावापर्यंत पावणेचारशे किलोमीटर अंतर कापले आहे. छत्तीसगड सीमा देवरी जवळपास सव्वाआठशे किलोमीटरचे अंतर पार करून नागरिकांना सोडले आहे. सात दिवसांपासून एसटी चालक व कर्मचारी काम करीत आहेत. गाडी निघण्यापूर्वी गाडीचे निर्जंतुकीकरण व ज्या ठिकाणी पोहोचते. त्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितेसाठी मास्क पुरवण्यात येत आहेत. शिरूर आगारातून सात दिवसांत 4 हजार 571 परप्रांतीय मजुरांना सोडण्याचे काम केले आहे. शिरूर प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख, तहसीलदार लैला शेख, शिरूर एसटी बसस्थानक प्रमुख महेंद्र माघाडे यांच्या सहकार्यातून हे काम सुरू आहे.