आले लागवडीतून घेतले विक्रमी उत्पादन पाडेगावच्या प्रयोगशील शेतकऱ्याने दीड एकरात केली लाखोंची कमाई !

लोणंद – फलटण तालुक्यातील पाडेगावच्या एका शेतकऱ्याने आले लागवडीतून एकरी तब्बल ४५ टनांचे विक्रमी उत्पादन घेत लाखोंची कमाई केली आहे. शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. हे प्रयोगशील शेतकरी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक पद्धतींचा अवलंब करून मोठया प्रमाणात उत्पादन घेत आहेत. अशाच प्रयोगशील शेतकऱ्याने आले लागवड करत दीड एकरात एकरी ४५ टन उत्पादन घेत एकरी ११ लाखांहून अधिक नफा कमावला आहे.
या शेतकऱ्याचे नाव रमेश विठ्ठल अडसूळ असे आहे. रमेश अडसूळ यांचा लोणंद येथे शेतीसाठी लागणारी ट्रॅक्टर ट्राॅली व शेती औजारे बनवण्याचा व्यवसाय आहे. पारंपरिक पिकांच्या माध्यमातून अधिक उत्पन्न मिळत नसल्याने त्यांनी शेतीला आधुनिकतेची जोड देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी व्यवसायाबरोबरच शेतीकडेही लक्ष केंद्रित करून पीक पद्धतीत बदल करण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी जिल्ह्यातील नायगावचे शेतकरी बाबासो नेवसे यांच्या सल्ल्यानुसार आले पिकाची लागवड केली. लोणंद येथील सोमनाथ लकडे यांचे पीक व्यवस्थापनपर मार्गदर्शन घेतले. रमेश अडसूळ यांची पाडेगावला आठ एकर शेती आहे.
ऊस पिकावर अवलंबून न राहता विविध पिकांची लागवड ते करत आहेत. अडसूळ यांनी दीड एकरात आले पिकाची बेड बनवून लागवड केली. यासाठी तीन महिने पूर्वमशागत करताना शेणखत, कोंबडखत, राख, निंबोळी आदींच्या १५ ट्राॅली दीड एकरात टाकल्या तर पिकावर तीन बेसल डोस व वेळोवेळी फवारणी केल्या. पिकासाठी संपूर्ण ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला आहे. पहिल्या वर्षी त्यांनी सर्व आले बियाणे म्हणून विक्री केले.
तर यावर्षी त्यांना आले पिकातून एकरी सतरा लाख रुपये याप्रमाणे आले उत्पादन मिळाले आहे. त्यांना एकरी ६ लाख रुपये असा एकूण ९ लाख खर्च आला. खर्च वजा जाता त्यांना एकरी ११ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला. या दीड एकरातील आले पिकाव्यतिरिक्त अजून सव्वादोन एकरात त्यांनी आल्याची लागवड केली आहे. आले पिकातून विक्रमी उत्पादन मिळाले. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी आल्याला बाजारभाव थोडा कमी मिळाला असून घाऊक बाजारात सरासरी ४२ हजार रूपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला, असे अडसूळ यांनी सांगितले.
केळी, पपई, आंबा, सफरचंदाचीही लागवड
शेतकरी रमेश अडसूळ प्रयोगशील शेतकरी असून त्यांनी आपल्या अन्य शेतीमध्ये केळी, पपई, केशर आंबा, सफरचंद, ऊस अशी लागवड केली आहे. ज्यामध्ये त्यांना चांगला आर्थिक फायदा मिळाला आहे. अर्थात शेतकऱ्यांनी एकाच पिकाच्या लागवडीवर अवलंबून न राहता पीक पद्धतीत विविधता आणण्याची गरज असल्याचे रमेश अडसुळ यांचे मत आहे.





