Rahul Gandhi : मृतांचा खरा आकडा जाहीर करण्यात आलेला नाही; महाकुंभ मेळा दुर्घटनेविषयी राहुल गांधी यांचा दावा

नवी दिल्ली : महाकुंभ मेळ्यात नुकत्याच घडलेल्या दुर्घटनेत जीवितहानी झाली. मात्र, मृतांचा खरा आकडा जाहीर करण्यात आलेला नाही, असा दावा कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी केला. दिल्ली विधानसभा निवडणुकीतील कॉंग्रेसच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलताना राहुल यांनी दुर्घटनेचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावरून केंद्र सरकारवर शाब्दिक हल्लाबोल केला.
अर्थसंकल्पातून सामान्य नागरिकांना अल्प दिलासा देण्यात आला. अर्थसंकल्पाचा खरा उद्देश देशातील २५ ते ३० श्रीमंतांना लाभ पोहचवणे हा आहे. मागासवर्गीय, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांना जीएसटी भरावा लागतो. मात्र, अर्थसंकल्पाचे लाभ अदानी-अंबानींसारख्या उद्योगपतींना मिळता, असा आरोप त्यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर राहुल यांनी एकाचवेळी निशाणा साधला. ते दोन्ही नेते खोटी आश्वासने देतात. मोदींनी भ्रष्टाचार संपवण्याची आणि गंगा नदी स्वच्छ करण्याची आश्वासने दिली. केजरीवाल यांनीही भ्रष्टाचार संपुष्टात आणण्याची आणि यमुना नदी स्वच्छ करण्याची हमी दिली. मात्र, ते दोघेही अपयशी ठरले. नव्या पद्धतीचे राजकारण करण्याचे आश्वासन देऊन केजरीवाल यांनी जनतेची दिशाभूल केली, असे ते म्हणाले.





