“राणे कुटुंब कोकणात होते मग सरदेसाईंनी मुंबईत कोणाला आव्हान दिले”; शिवसेनेच्याच नेत्याकडून घरचा आहेर

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे काल दिवसभर राज्यात एकच गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. यावेळी शिवसेनेने प्रचंड आक्रमक भूमिका घेतली तर या प्रकरणात युवासेनेनेदेखील उडी घेतली होती. . युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी थेट राणे यांच्या जुहू येथील घरासमोर राडा केला. त्यावेळी त्यांनी राणे कुटूंबियांना आव्हान दिले होते. मात्र त्याच्यात या आव्हानाचा शिवसेनेकडून समाचार घेण्यात आला असल्याचे दिसत आहे.
राणे यांच्या जुहू येथील घरासमोर युवा सेना व राणे समर्थक एकमेकांना भिडले. पोलिसांना लाठीमारही करावा लागला. स्वतः युवा सेना सचिव सरदेसाई भिडल्याची क्लिप व्हायरल झाली. सरदेसाई यांनी रस्त्यावर ठाण मांडून थेट राणे परिवाराला आव्हान दिले. या साऱ्या घटनांचे व्हिडीओ तत्काळ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले.
सरदेसाई एकटेच अख्ख्या राणे कुटुंबाला भिडल्याचे चित्र यानिमित्ताने तयार झाले. ‘दगड, लाठ्या, बंदुका, काहीपण आणा, उद्धव साहेबांविषयी चुकीचे बोलणाऱ्यांसाठी आमचे हातच काफी आहेत’ या सरदेसाई यांच्या विधानाचे फोटो सोशल मीडियात फाॅरवर्ड केले गेले. यावेळी त्यांची प्रतिमा उंचावण्यासाठी युवासैनिक सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रयत्न करत होता असे दिसले परंतु, या सर्व प्रकरणावर शिवसेनेच्या ज्येष्ठ आणि जुन्या नेत्याने टिप्पणी केली आहे.
राणे कुटुंबाला घरात घुसून आव्हान देणाऱ्या वरुण सरदेसाई यांना शिवसेनेच्या सोशल मीडियाने डोक्यावर घेतले आहे. पण, राणे कुटुंबीय जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने कोकणात होते. जुहूच्या घरी कोणीच नव्हते. मग, अशा वेळी रस्त्यावर बसून कोणत्या राणेंना खाली उतरण्याचे आव्हान दिले गेले, हे शोधावे लागेल, अशी तिरकस टिप्पणी शिवसेनेतील एका जुन्या नेत्याने केली आहे.





