Pune District : संग्रामदुर्ग किल्ल्याची तटबंदी कोसळली
Pune District : प्रत्यक्ष पाहणीत तटबंदीच्या एका कोपर्याचा मोठा भाग पूर्णपणे खचल्याचे दिसून आले. बाहेरील दगडी बांधकाम तुटून आतील भराव आणि मोठ्या प्रमाणातील दगड खंदकात कोसळले आहेत.

चाकण : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका चाकण येथील ऐतिहासिक संग्रामदुर्ग किल्ल्याला बसला असून किल्ल्याच्या दक्षिणेकडील तटबंदीचा मोठा भाग कोसळला आहे. या घटनेमुळे शिवकालीन ऐतिहासिक वारशाचे नुकसान झाले असून इतिहासप्रेमी, दुर्गप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. किल्ल्याच्या संवर्धनाबाबत प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
प्रत्यक्ष पाहणीत तटबंदीच्या एका कोपर्याचा मोठा भाग पूर्णपणे खचल्याचे दिसून आले. बाहेरील दगडी बांधकाम तुटून आतील भराव आणि मोठ्या प्रमाणातील दगड खंदकात कोसळले आहेत. त्यामुळे उर्वरित तटबंदीही धोकादायक स्थितीत असल्याची भीती व्यक्त होत आहे. आणखी मुसळधार पाऊस झाल्यास अधिक नुकसान होण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली. स्थानिकांच्या माहितीनुसार, सुमारे आठ ते दहा वर्षांपूर्वी तटबंदीच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले होते; मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पारंपरिक दगडी बांधकाम तंत्राऐवजी निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर झाल्यामुळे पावसाचे पाणी तटबंदीच्या आतील भागात झिरपले आणि त्यामुळे मूळ संरचना कमकुवत होऊन तटबंदी कोसळल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. या दाव्याची अधिकृत पुष्टी झालेली नसली तरी घटनेनंतर दुरुस्तीच्या गुणवत्तेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक मनोहर वाडेकर यांनी या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत शासनाने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांनी तब्बल 56 दिवस शत्रूशी प्राणपणाने लढा दिला. त्या युद्धातही तटबंदी इतकी ढासळली नव्हती; मात्र आज संवर्धनातील हलगर्जीपणामुळे तटबंदी कोसळणे दुर्दैवी आहे, असे त्यांनी सांगितले.
इतिहास अभ्यासकांच्या मते, इ.स. 1660 मध्ये मुघल सरदार शाहिस्तेखानाने संग्रामदुर्गावर वेढा घातला असताना किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांनी अत्यल्प सैन्याच्या बळावर 56 दिवस मुघल सैन्याचा प्रतिकार करून मराठ्यांच्या शौर्याचा अद्वितीय इतिहास घडवला होता. त्यामुळे संग्रामदुर्गाला मराठा इतिहासात विशेष स्थान आहे.
दरम्यान, कोसळलेल्या तटबंदीची पाहणी करण्यासाठी नागरिक आणि पर्यटकांची गर्दी होत असून सुरक्षेच्या दृष्टीने हा परिसर धोकादायक ठरत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने हा भाग बंदिस्त करून आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे.
वैज्ञानिक पद्धतीने संवर्धन करावे
किल्ल्याची तटबंदी, बुरुज, प्रवेशद्वार आणि इतर अवशेष आजही शिवकालीन स्थापत्यकलेची साक्ष देत आहेत. मात्र नियमित संवर्धनाचा अभाव, अपुरा निधी, वाढते अतिक्रमण, झाडाझुडपांची वाढ आणि निकृष्ट दर्जाची दुरुस्ती यामुळे किल्ल्याचे अस्तित्व धोक्यात येत असल्याची खंत इतिहास अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. घटनेनंतर इतिहासप्रेमी, दुर्गप्रेमी आणि विविध सामाजिक संघटनांनी राज्य सरकार, पुरातत्त्व विभाग आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून कोसळलेल्या तटबंदीची ऐतिहासिक वारसा जपत पुनर्बांधणी करावी, उर्वरित तटबंदीची संरचनात्मक तपासणी करून वैज्ञानिक पद्धतीने संवर्धन करावे आणि त्यासाठी विशेष निधी मंजूर करावा, अशी मागणी केली आहे.





