जांभळी खोऱ्याचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी

वाई (प्रतिनिधी) – नावेचीवाडी येथील ओढ्यावरील पुलाला भगदाड पडल्याने पश्चिम भागातील दळणवळणाचा प्रश्न गंभीर झाला होता. पालिका प्रशासनाने तातडीने या ठिकाणी नवीन पूल उभारुन पश्चिम भागाचा दळणवळणचा प्रश्न मार्गी लावला आहे. आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते नुकतेच या पुलाचा लोकार्पण सोहळा पार पडला.
यावेळी पालिकेच्या मुख्याधिकारी विद्या पोळ, उपनगराध्यक्ष अनिल सावंत, तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे कार्याध्यक्ष संजय लोळे, माजी नगराध्यक्ष भूषण गायकवाड, रमेश आप्पा गायकवाड, ठेकेदार मंगलसिंग परदेशी, नगरसेवक सौ. शितल शिंदे, अजित शिंदे, प्रदीप चोरगे, राजेश गुरव, चरण गायकवाड, माजी नगरसेवक दीपक हजारे, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अशोकराव सरकाळे, प्रसाद मामा देशमुख, किरण काळोखे, प्रा. शालीवान नलावडे, चंद्रकांत शिर्के, नाना शिंदे, कार्यालयीन अधीक्षक नारायण गोसावी, कंस्लटंट इंजिनिअर मोहन काटकर, पालिका बांधकाम विभाग अभियंता सचिन धेडे, श्री. जोशी, संतोष परदेशी, पालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. मकरंद पाटील म्हणाले, तालुक्याच्या पश्चिम भागातील जांभळी खोऱ्याला जोडणाऱ्या नावेचीवाडी येथील खांबोळ्या ओढ्यावरील ब्रिटिश कालीन पुलाला भगदाड पडले होते. त्यामुळे जांभळी खोऱ्यात जाणाऱ्या एसटी व जड वाहनांची वाहतूक खंडित करण्यात आली होती. त्यामुळे जांभळी खोऱ्यातील चाळीस गावांतील लोकांचा दळणवळणाचा प्रश्न गंभीर झाला होता. या भागतील नागरिकांची गैरसोय होत असल्याने वाई नगरपालिकेने युध्द पातळीवर या पुलाचे काम पूर्ण केले.
पालिकेने सदर पुलाचे अंदाजे 74 लाख 84 हजार 973 रुपये खर्चाचे नवीन पुलाचे बांधकाम जिल्हास्तरीय नगरोत्थान योजनेतून हाती घेतले होते. परंतु त्यानंतर करोनामुळे लॉक डाऊन सुरू झाला. मात्र तरीही काम युध्दपातळीवर करण्यात पालिकेला यश आले आहे. या पुलामुळे पश्चिम भागातील जांभळी खोऱ्यातील चाळीस गावांचा दळणवळणाचा प्रश्न सुटला आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमदार मकरंद पाटील व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून, फीत कापून व शिल्डचे अनावरण करण्यात आले. यावेळी नावेचीवाडी, गंगापुरी व वाईतील नागरिकांची उपस्थिती होती.





