“ऑपरेशन लोटस’मागे प्रकल्प पळविण्याचा उद्देश

नगर -राज्यात वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने सत्ताधारी आणि विरोधकात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता या मुद्द्यावर राज्याचे माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी सरकारवर खरमरीत टीका केली आहे. हा प्रकल्प राज्याबाहेर जाणे दुर्दैवी आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र ही तीन राज्ये स्पर्धेत होती. कंपनीला तळेगाव येथील जागाही मान्य होती. मग, नंतर काय घडले ? याची कारणे सांगण्यात आता अर्थ नाही. भारतीय जनता पार्टीच्या ऑपरेशन लोटसमागे प्रकल्प पळविण्याचाही उद्देश असू शकतो, अशी टीका आ. थोरात यांनी केली.
जिल्हा बॅंकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी थोरात शुक्रवारी नगरमध्ये आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. थोरात पुढे म्हणाले, राज्यात नवे सरकार येऊन अडीच महिने झाले आहेत. हे सरकार कायदेशीर आहे की बेकायदेशीर हे न्यायालय ठरवेल. मात्र, त्यांचे दोन महिने शासन निर्णयात व खातेवाटपात गेले. अद्याप जिल्ह्याला पालकमंत्री नाही. सरकार काहीही घोषणा करत असले तरी प्रशासन मात्र ठप्प आहे. सध्या सरकारमध्ये कोणताही मेळ नाही. सरकार गोंधळलेले आहे. जिल्हा नियोजन समितीचा निधी याआधी कधीही थांबवला गेला नव्हता. हे पहिल्यांदाच घडले आहे. शासन प्रशासन म्हणून लक्ष नाही त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. सरकार कुठे आहे ? असे विचारण्याची वेळ आता आली आहे, अशी जोरदार टीका आ. थोरात यांनी केली.





