ग्रामसेवक दाखला देत नसल्याने नेवासा पंचायत समितीच्या दालनात बांधकाम कामगारांचे ठिय्या आंदोलन

नेवासा (प्रतिनिधी) : समर्पण मजदूर संघाच्या वतीने आपल्या विविध मागण्यासाठी नेवासा पंचायत समितीच्या दालनात बांधकाम कामगारांच्या वतीने ठिय्या मांडून धरणे आंदोलन करण्यात आले.या धरणे आंदोलनाचे नेतृत्व कामगार नेते डॉ. करणसिंह घुले व कॉ.ॲड.बन्सीभाऊ सातपुते यांनी केले. समर्पण मजदूर संघाचे सदस्य असलेले तालुक्यातील सर्व असंघटित क्षेत्रातील बांधकाम मजूर यांनी ग्रामसेवकांकडून ९० दिवस काम केल्याचा दाखला मिळत नसल्यामुळे निषेध व्यक्त करत धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी नेवासा तालुक्यातून मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते. पंचायत समिती प्रशासनाने आदेश देऊनही दाखले न देणाऱ्या ग्रामसेवकांना कायदेशीर नोटीस बजावण्याची तयारी दाखवली. परंतु कामगारांचे समाधान होऊ शकले नाही. जे ग्रामसेवक दाखले देत नाहीत त्यांना तातडीने समोर हजर करा या मागणीवर कामगार ठाम होते. सरते शेवटी विस्तार अधिकारी बाळासाहेब कासार व नवनाथ पाखरे साहेब यांनी ग्रामसेवक संघटना, कामगार संघटना, सहा कामगार आयुक्त कार्यालय अहमदनगर येथील अधिकारी यांची गटविकास अधिकारी यांच्या दालनात समन्वय बैठक घेण्याबद्दल पुढाकार घेतला.
या प्रस्तावास सर्व कामगारांनी सकारात्मक विचाराने पाठिंबा दिला. दिनांक १९ जुलै २०२४ रोजीची दाखले देण्याबाबतची समन्वय बैठक होईपर्यंत आंदोलन स्थगित करण्याबाबत आंदोलकांमध्ये एकमत झाले आणि आंदोलन १९ तारखेपर्यंत स्थगित करण्यात आले. परंतु १९ तारखेनंतर जर दाखले मिळाले नाही तर कोणतीही पूर्व सूचना न देता तातडीने उग्र आंदोलनाचा इशारा बांधकाम कामगारांनी पंचायत समिती प्रशासनाला दिला आहे.यावेळी कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता महिलांची ही उपस्थिती लक्षणीय होती.
यावेळी झालेल्या ठिय्या धरणे आंदोलनात समर्पण मजदूर संघाचे कृष्णा डहाळे,पांडू मते,सुभाष गारुळे,ज्ञानेश्वर धिरडे,अमोल शेरे,संजय उदमले,यासीन मिस्तरी, दीपक भोंगळ, रंगनाथ डुकरे ,पप्पू चेमटे, गणेश थोरे, दत्तू भारस्कर, राजू वडागळे, डेव्हिड साळवे यांच्यासह पुरुष व महिला कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.





