‘आयटी’नगरीत गुन्हेगारांचा सुळसुळाट

दहा दिवसांत तीन खून लुटमारीचेही प्रकार वाढले
पिंपरी – आयटी कंपन्यांमुळे जागतिक नकाशावर आलेल्या हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या दहा दिवसांत तीन खूनाच्या घटना घडल्या. तसेच, महामार्गावरील लुटमार, चोऱ्या, घरफोड्या व हाणामारीच्या प्रकारातही वाढ झालेली आहे. त्यामुळे आयटीनगरीच असुरक्षित झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
हिंजवडीत शेकडो आयटी कंपन्या आहेत. त्यामुळे या भागात देशाच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर परदेशीतूनही नागरिक मोठ्या संख्येने शहरात येत असतात. येथील कंपन्या आणि कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी नुकतेच हिंजवडी पोलीस ठाण्याची सूत्रे हाती घेतली. मात्र, त्यांना अद्याप सूर सापडला नसल्याचे गुन्ह्यांच्या वाढत्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. याव्यतिरिक्त स्थानिक नागरिकांकडून देखील पोलिसांच्या मनमानी कारभाराविषयी देखील तक्रारी वाढू लागल्या आहेत.
21 नोव्हेंबर रोजी हिंजवडी येथे तीन जणांनी मिळून निवल सुकलाल पावरा (वय 27, रा. साखरे-हुलावळे वस्ती, हिंजवडी) या तरुणाचा डोक्यात दगड घालून त्यांचा खून केला. खुनाची दुसरी घटना जांबे येथे शुक्रवारी (दि. 27) रोजी उघडकीस आली. पैशांच्या लोभापायी गणपत सदाशिव सांगळे (वय 24, रा. कळस, ता. इंदापूर, जि. पुणे) या तरुणाच्या डोक्यात अज्ञात वस्तूने प्रहार करून त्यास ठार मारण्यात आले. याप्रकरणी अरविंद यादव नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खुनाची तिसरी घटना 30 नोव्हेंबर रोजी बंगलोर मुंबई महामार्गावरील बाणेर येथील उदशाहवली दर्ग्याच्या मोकळ्या जागेत घडली. संदीप पुंडलिक माईनकर (वय 53, रा. पिंपरी) यांना अज्ञात आरोपींनी जीवे मारून पुरावा नष्ट करण्यासाठी पेटवून दिले. हा प्रकार सोमवारी (दि. 30) सकाळी उघडकीस आला.
जमिनीच्या लिटिगेशनमध्येच रस
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शहरातील अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, जमिनीच्या लिटिगेशनमध्ये स्थानिक पोलिसांनी अभिप्राय न घेता परस्पर गुन्हे दाखल न करण्याचे आदेश दिले. मात्र, तरीही ठाण्यातील काही पोलीस अधिकारी लिटिगेशनमध्ये अधिक रस दाखवत असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. याबाबत काही जणांनी थेट पोलीस आयुक्तांकडेच तक्रारी केल्या आहेत. तसेच, अवैध धंदे बंद करण्याचे आदेश असूनही हिंजवडी परिसरातील हॉटेलमध्ये अवैध मद्यविक्री, हुक्का पार्लर जोमात सुरु असल्याचे वेळोवेळी सामाजिक सुरक्षा पथकाने केलेल्या कारवाईनंतर उघड झाले आहेत.





