मंगळवारी दिल्लीत आढावा बैठक : जपान सरकारकडून वारंवार कान उघाडणी
पुणे – मरणासन्न अवस्थेत असलेल्या मुळा-मुठा नदीला पुनरूज्जीवित करण्यात महापालिकेकडून जपानमधील “जायका’ कंपनीच्या माध्यमातून मुळा-मुठा नदी संवर्धन योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेस केंद्राने मान्यता देऊन तीन वर्षे झाली तरी या योजनेचे काम अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे केंद्राकडून तसेच जपान सरकारकडून महापालिकेची वारंवार कान उघडणी केली जात आहे. असे असतानाच, मागील वर्षी 3 डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत या प्रकल्पांच्या सर्व निविदांची कामे पूर्ण करण्यात यावीत तरच यापुढे निधी दिला जाईल, असा इशारा महापालिकेस देण्यात आला होता. मात्र, अद्यापही ही कामे मान्यतेच्या अवस्थेतच असल्याने या बैठकीत पालिकेची चांगलीच अडचण होणार असल्याचे चित्र आहे.
जपानमधील “जायका’ कंपनीच्या माध्यमातून सुमारे 991 कोटींचा नदीसुधार प्रकल्प पालिका राबविणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्राने 2016 मध्ये मान्यता दिली असली तरी, त्यानंतर या कामासाठी सल्लागार नेमण्यास केंद्राने सुमारे दीड वर्षे घेतली. त्यामुळे या योजनेचे कामच पुढे सरकले नाही. त्यानंतर केंद्राकडून आतापर्यंत पालिकेस सुमारे
57 कोटींचे अनुदान देण्यात आले असले तरी, त्यात केवळ पालिकेकडून या प्रकल्पासाठी टाकण्यात येणाऱ्या ड्रेनेज लाईनचे कामच हाती घेण्यात आले असून या योजनेअंतर्गत नदीच्या दोन्ही बाजूस बांधण्यात येणाऱ्या 11 सांडपाणी शुद्धीकरण केंद्र तसेच स्वच्छतागृहांच्या कामांच्या अद्याप निविदाच काढल्या जात आहेत.
डिसेंबर 2018 मध्ये केंद्राकडे झालेल्या आढावा बैठकीतच पालिकेच्या या कामाच्या गतीबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. तसेच, पुढील बैठकीपूर्वी निविदा प्रक्रिया पूर्ण करून कालमर्यादेत हे काम करण्याच्या सूचना पालिकेस देण्यात आल्या होत्या. मात्र, अजूनही हे काम झालेले नाही. तर “जायका’ कंपनीने सुद्धा पालिकेच्या या कामाबाबत तसेच निधी खर्चाबाबत जपान सरकार नाराज असल्याचे पालिकेस कळविले आहे. त्यामुळे आधीच केंद्र शासन तसेच निधी देणारी संस्था पालिकेवर नाराज असतानाच; आता पुन्हा सहा महिन्यांनंतरची आढावा बैठक आली तरी या कामात म्हणावी तेवढी प्रगती नसल्याने हा प्रकल्प पालिकेला भोवणार असल्याचे चित्र आहे. दिल्लीत होणाऱ्या या बैठकीस महापालिका, राष्ट्रीय नदी संवर्धन प्राधिकरण, केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, अर्थमंत्रालय, “जायका’ कंपनी तसेच जपान सरकारचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
आयुक्तांनी बोलविली बैठक
दिल्ली येथे 14 मे रोजी बैठक होणार असल्याने महापालिका आयुक्त सौरभ राव या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे त्यांनी 13 मे रोजी या प्रकल्पाशी संबंधित सर्व विभागांची बैठक येत्या 13 मे रोजी लावली आहे. या बैठकीतील माहितीच्या आधारे ते दिल्ली येथे प्रकल्पाच्या प्रगतीचे सादरीकरण करणार आहेत.