कोपर्डेहवेली परिसरातील शेतांमध्ये उंदरांचेही प्रमाण वाढल्याने बसतोय शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका
कोपर्डेहवेली – कोपर्डे हवेली परिसराला ऊसपट्टा अशी ओळख आहे. आधुनिक पद्धतीने ऊस शेती करीत शेतकरी जादा उत्पादन घेत असतात. पण गेली 7 ते 8 महिन्यापूर्वी झालेला हुमणी किडीचा प्रादुर्भाव व ऊस पिकात उंदराचे वाढलेले प्रमाण आदि कारणाने ऊसाचे वजन घटल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
कोपर्डे हवेली परिसरात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. आडसाली हंगामासह सुरुची लागण ऊसाची लागण करुन उत्पादन घेतले जाते. त्यासाठी चांगल्या जातीच्या ऊस बियाणांची निवड करुन शेतकऱ्यांचा जादा उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न असतो. एकरी ऐंशी ते शंभर टन ऊसाचे उत्पादन घेणारे काही शेतकरी आहेत. सरासरी एकरी सुरुच्या लागण आणि आडसाली ऊसाची लागण पन्नास टनाने उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जादा आहे.
हेच उत्पादन खोडवा पिकाच्या वेळी कमी टनेज देते. त्यासाठी खोडवा पिकातून उत्पादन जादा घेण्यासाठी वेगवेगळ्या पध्दतीचा वापर केला जातो. गेल्या आठ ते दहा महिन्यापूर्वी ऊस पीकाला हुमणी किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता.ही किड आटोक्यात आणण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केले होते. पण ऊसाचे वजन घटत असल्याने ते प्रयत्न अपुरे ठरल्याचे दिसून येत आहेत. आडसाली ऊसापेक्षा खोडवा ऊसाचे वजन घटण्याचे प्रमाण जास्त असल्याने शेतकरी चिंतेत आहे. हुमणीचे संकट असतानाच गेल्या चार महिन्यापासून उंदराच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. उंदरांकडून ऊसाच्या मुळ्या कुरतडल्याने ऊसाच्या वजनात घट झाली आहे. ऊसाचा गळीत हंगाम सुरु असून या संकटामुळे अनेक शेतकरी ऊस टनेज कमी असल्याचे सांगत आहेत.
पाऊस कमी झाल्यानेच प्रादुर्भाव
हुमणी किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी थायमेट, बीएस सी पावडर, वेगवेगळ्या किटक नाशकांच्या रासायनिक फवारण्या तसेच कृषी अधिकारी, सह्याद्री कारखान्याचे मार्गदर्शन आदिसह इतर गोष्टी करण्यात आल्या होत्या. तर उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी उंदीर मारी वनस्पतीचा वापर करण्यात आला होता.बंदोबस्तासाठी उंदीर मारीचा वापर
गत पावसाळ्यात पावसाचे प्रमाण इतर विभागाच्या तुलनेत कोपर्डे हवेली परिसरात कमी होते. त्याचा परिणाम म्हणून हुमणी किडीचा प्रादुर्भाव ऊस पिकावर झाला आहे. जादा पाऊस असेल तर उंदरे ऊसात थांबत नाहीत. तसेच त्यांची उत्पती कमी राहते. हुमणी, उंदीर दोन्ही गोष्टीचा ऊस पीकावर परिणाम होवून ऊसाचे वजन घटत आहे.