दोन हजार रुपये बदलण्याची प्रक्रिया आजपासून सुरू; बँकेत जाण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे

मुंबई – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने शुक्रवारी 2 हजार रुपयांच्या गुलाबी नोटांवर मोठा निर्णय घेत त्या चलनातून बाद करण्याची घोषणा केली. या नोटा आता नागरिकांना 23 मे ते 30 सप्टेंबर पर्यंत बँकेतून बदलता येणार आहेत. बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्याची आणि बदलण्याची प्रक्रिया ही 23 मेपासून म्हणजेच आजपासून सुरू झाली आहे. मात्र बँकेतून जाऊन 2 हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यापूर्वी तुम्ही काही महत्त्वाचे मुद्दे जाणून घेणे अपेक्षित आहे.
23 मे ते 30 सप्टेंबर 2023 कालावधीत नोटा बदलता येतील
आरबीआयकडून 2000 रुपयांची नोट 23 मे ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये बँकांमध्ये जाऊन बदलता येणार आहेत. 2000 रुपयांची नोट बदलून हे पैसे तुम्ही खात्यातही जमा करू शकता. याशिवाय तुम्ही या नोटांवर वस्तूही खरेदी करू शकता. मात्र एका वेळी फक्त 10 नोटा बदलता येणार आहे.
बँक खात्यात नोटा जमा करण्यासाठी मर्यादा नाही
बँक खात्यात 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. बँकिंग नियमांनुसार, तुम्हाला 50,000 किंवा त्याहून अधिक रक्कम ठेवल्यावर पॅन-आधार कार्ड दाखवावे लागेल. याशिवाय पैसे जमा करताना आयकराचे नियम लक्षात ठेवावे लागतील. जास्त पैसे जमा केल्यावर तुम्हाला आयकर विभागाची नोटीस मिळेल. नागरिक त्याच्या बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन बँक कर्मचाऱ्यांकडून नोटा बदलून घेऊ शकतात.
30 सप्टेंबरनंतर नोटा बदलण्यासाठी आरबीआय कार्यालयात जावे लागणार
जर तुम्ही 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 रुपयांच्या नोटा जमा केल्या नाही तर या नोटा अवैध होतील असे नाही. मात्र त्यानंतर तुमच्या नोटा बँकेत बदलता येणार नाहीत. 30 सप्टेंबरनंतर तुम्हाला नोटा बदलण्यासाठी आरबीआय कार्यालयात जावे लागेल. परंतु, याबाबत आरबीआयकडून कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आलेली नाहीत.
नोटा बदलण्यासाठी ओळखपत्राची गरज नाही
पैसे बदलण्यासाठी कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र देण्याची गरज लागणार नाही, असे आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. मात्र काही बँकांनी ज्यांचे त्या बँकेत खाते नाही अशा ग्राहकांसाठी ओळखपत्राची तरतूद केली आहे.



