कचऱ्याची समस्या उग्र

शहरातील सोसायट्यांमध्ये निर्माण होणाऱ्या
कचरा संकलनाबाबतच्या अटी सोसायटीधारकांना जाचक

पिंपरी – शहरातील सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याची समस्या उग्र बनत चालली आहे. शंभर किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण होणाऱ्या सोसायट्यांनी संबंधित कचरा सोसायटीच्या परिसरातच जिरवावा, अशी महापालिका प्रशासनाची भूमिका आहे.

जागेच्या उपलब्धतेचा अभाव, कचरा खत निर्मिती प्रकल्प उभारणी आणि देखभाल-दुरूस्तीसाठी लागणारा लाखो रुपयांचा खर्च, कचरा संकलन नियमावलीविषयी अस्पष्टता आदी प्रमुख कारणांमुळे सोसायटीधारकांना मात्र, ही अट जाचक बनली आहे.
शहरात दररोज सुमारे 900 मेट्रीक टन इतका कचरा जमा होत आहे.

या कचऱ्यावर मोशी कचरा डेपो येथे विविध मार्गाने प्रक्रिया केली जात आहे. यांत्रिकी पद्धतीने खत निर्मिती, गांडूळ खत प्रकल्प, सॅनिटरी लॅंडफिल, प्लॅस्टिकपासून इंधन निर्मिती अशा विविध प्रकल्पांच्या माध्यमातून कचरा जिरवला जात आहे. त्याशिवाय, येथे कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पाचे काम सुरू आहे. शहरातील सोसायट्यांमध्ये दररोज 40 किलोपासून 150 किलोपर्यंत कचरा निर्माण होतो. सोसायट्यांमध्ये असलेल्या सदनिका, तेथे राहणाऱ्या रहिवाशांची संख्या यांच्या प्रमाणात दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी-जास्त आहे. सोसायट्यांमध्ये आकारला जाणारा वार्षिक देखभाल-दुरूस्ती खर्चच देताना सोसायटीधारकांना नाकीनऊ येत असल्याची भूमिका गृहनिर्माण संस्था फेडरेशनने मांडली आहे.

दररोज शंभर किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण होणाऱ्या किंवा पाच हजार चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या सोसायट्यांना सोसायटी पातळीवरच कचरा जिरवण्याची यंत्रणा उभारणे महापालिकेने बंधनकारक केले आहे. शहरात सुमारे 70 सोसायट्यांनी ही यंत्रणा उभारलेली आहे. याबाबत अंमलबजावणी करण्याची नोटीस 874 सोसायट्यांना महिनाभरापूर्वीच बजावली आहे.

– डॉ. के. अनिल रॉय, मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका.

शंभर किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्या पालिका कशा ठरवणार, याबाबत नियमावलीत अस्पष्टता आहे. सोसायटीमध्ये खत निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी सुमारे 20 लाख रुपये इतका खर्च लागू शकतो. तसेच, मनुष्यबळ, वीजपुरवठा, रसायनांची खरेदी आदींसाठी दरमहा लागणारा खर्च वेगळा आहे. कचरा संकलन करण्याची पालिकेची जबाबदारी आहे. सोसायट्यांसाठी ही अट बंधनकारक करणे जाचक आहे.

– के. सी. गर्ग, सरचिटणीस, सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशन 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)