बनावट नोटांची समस्या, हा केंद्राच्या नोटबंदीच्या धोरणांचा सपशेल पराभव – गृहमंत्री वळसे पाटील

मुंबई – नोटबंदी केल्यानंतर केंद्र सरकारने जी कारणे दिली, त्यात महागाई हे देखील एक कारण होते. तसेच बनावट नोटा निकाली काढण्याबाबतही सांगितले होते. मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा अहवाल पाहिल्यास बनावट नोटांची संख्या वाढली असल्याचे कळते. त्यामुळे नोटबंदीच्या धोरणात केंद्र सरकारकडून चूक झालेली आहे. केंद्र सरकारने यासंबंधी भूमिका स्पष्ट करुन त्यांचे धोरण कुठे फसले? हे सांगितले पाहीजे, अशी मागणी बनावट नोटांविषयी भाष्य करताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे विविध विषयावर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले की, बनावट नोटांची समस्या बनावट नोटांविषयी भाष्य ही भारतीय अर्थव्यवस्थेला अडचण निर्माण करणारी आहे. केंद्र सरकारच्या धोरणांचा हा सपशेल पराभव आहे. या प्रकरणात केंद्र सरकारने चौकशी करुन पुढील उपाययोजना ठरविल्या पाहीजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
गृहमंत्री पुढे म्हणाले की, आज जे विषय महत्त्वाचे नाहीत असे विषय काढून देशात सगळ्याच ठिकाणी वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न काही लोकांकडून होत आहेत. राम जन्म किंवा हनुमान जन्म कुठे झाला? यापेक्षा आज महागाई, बेरोजगारी, टंचाई, कोरोना असे अनेक महत्त्वाचे विषय आहेत. हनुमानाचा जन्म कुठे झाला? हा वाद अनावश्यक आहे. मला वाटतं याला फार महत्त्व देऊ नये. यातून कायदा व सुव्यवस्थेचा काहीच प्रश्न निर्माण होणार नाही, असेही गृहमंत्री म्हणाले.
तसेच कर्नाटकच्या आमदाराने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा झेंडा हा राष्ट्रीय ध्वज करण्याबाबत वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा समाचार घेताना गृहमंत्री म्हणाले की, भारताचा राष्ट्रध्वज हा तिरंगा आहे आणि राहील. कुणी काहीही म्हटले तरी भारतीय नागरिक हा तिरंगाच राष्ट्रध्वज राहावा यासाठी प्राणपणाने लढेल.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांना धमक्या आल्या आहेत. याबाबत बोलत असताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असून जे कुणी दोषी असतील त्यांना कडक शिक्षा केली जाईल. सुरक्षेचा आढावा आम्ही अधूनमधून घेत असतो, गरज भासल्यास सुरक्षेत वाढ करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.





