नवी दिल्ली – कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचे नियोजन आणि तयारीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढावा घेतला. लस कधी तयार होऊ शकेल, यावरही चर्चा या बैठकीत चर्चा झाली.
दुर्बल आणि अधिक धोका असलेले लोक शोधून त्यांच्या त्वरित लसीकरणासाठी त्यांना प्राधान्य दिले जावे. कोणाचेही, कुठेही लसीकरण केले जावे, यात निवासी असल्याची वगैरे काहीही अट घालू नये. ही लस वाजवी दरात आणि सार्वत्रिक उपलब्ध असावी, कोणीही व्यक्ती वंचित राहू नये आणि लस उत्पादन ते लसीकरणापर्यंतच्या सर्व प्रक्रियांवर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने, 24 तास देखरेख ठेवण्याची व्यवस्था असावी, या चार मुद्द्यांवर पंतप्रधानांनी भर दिला.
सर्व, लोकांना प्रभावी पद्धतीने आणि नियोजित वेळेत, लस देण्याच्या या राष्ट्रीय कार्याला आधार देण्यासाठी, उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा आढावा घ्यावा आणि व्यापक प्रमाणात लसीकरण करण्यासाठीच्या प्रक्रियेचे सविस्तर नियोजनकार्य त्वरित हाती घ्यावे, असे निर्देशही पंतप्रधान मोदी यांनी अधिकाऱ्यांना दिले.