प्रभात वृत्तसेवा बेल्हे – मकरसंक्रांत आणि भोगीमुळे बाजारपेठेत बोरांना मागणी असून त्यांचे दर गगनाला भिडले आहेत. आळेफाटा व परिसरातील बाजारपेठेत एरव्ही ८० ते १०० रुपये किलोने मिळणारी विलायती बोरे सध्या २०० रुपये किलो दराने विकली जात आहेत. विशेष म्हणजे, संक्रांतीच्या पूजेसाठी परंपरेने वापरली जाणारी गावरान बोरे आता तालुक्यात कुठेही उपलब्ध नसून ही झाडे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. जुन्नर तालुक्यात पूर्वी शेताच्या बांधावर आणि माळरानावर सहज आढळणारी गावरान बोरांची झाडे बदलत्या शेतीपद्धती आणि वाढत्या झाडतोडीमुळे कमी झाली आहेत. या झाडांना असलेले टोकदार काटे शेतीकामात अडथळा ठरत असल्याने आणि मजुरांना दुखापत होत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी ही झाडे काढून टाकली आहेत. याउलट विलायती, बनारसी शामबोर आणि मेहकण यांसारख्या सुधारित वाणांची लागवड वाढली आहे. ही बोरे आकाराने मोठी, आकर्षक आणि अधिक काळ टिकणारी असल्याने ग्राहकांचा कलही या नव्या वाणांकडे वळला आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतातील मोकळ्या जागेची गरज वाढल्याने नैसर्गिकरीत्या वाढणाऱ्या गावरान बोरांच्या झाडांकडे दुर्लक्ष होत आहे. एकेकाळी ग्रामीण संस्कृतीचा भाग असलेली गावरान बोरे आता केवळ आठवणीतच उरली असून बाजारात पूर्णपणे विलायती बोरांचेच वर्चस्व निर्माण झाले आहे. बोरे खाण्याचे फायदे बोरे खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असल्याने त्वचा निरोगी राहते आणि हाडे मजबूत होतात. तसेच ही फळे लिव्हरच्या आरोग्यासाठी फायदेशीर असून, कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका कमी करण्यास मदत करतात.