नवी दिल्ली: देशातील तंबाखू शौकिनांना केंद्र सरकारने मोठा धक्का दिला आहे. संसदेने ‘सेंट्रल एक्साइज (संशोधन) विधेयक, २०२५’ मंजूर केले असून, यामुळे सिगरेट, सिगार, हुक्का आणि खैनीवरील उत्पादन शुल्कात (Excise Duty) प्रचंड वाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे तंबाखूजन्य पदार्थांच्या किमती आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता आहे. शुल्कात मोठी वाढ नवीन दुरुस्तीनुसार, सिगरेटवरील उत्पादन शुल्क प्रति १,००० स्टिकमागे २००-७३५ रुपयांवरून थेट २,७०० ते ११,००० रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे. ही वाढ सिगरेटच्या प्रकारावर आणि लांबीवर अवलंबून असेल. खैनीवरील शुल्क २५% वरून १००% पर्यंत, तर हुक्का तंबाखूवर २५% ऐवजी ४०% कर आकारला जाईल. विशेष म्हणजे, ‘स्मोकिंग मिक्सचर’वरील शुल्कात सहा पटीने वाढ होऊन ते ३००% पर्यंत पोहोचू शकते. खिशाला झळ सरकारी अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार, सध्या बाजारात १८ रुपयांना मिळणारी एक सिगरेट लवकरच ७२ रुपयांना मिळण्याची शक्यता आहे. वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी हे विधेयक सादर केले होते. या निर्णयावर नागरिकांमध्ये दोन गट पडले आहेत. काही सोशल मीडिया युजर्सनी या निर्णयाचे स्वागत करत ‘यामुळे व्यसन सुटण्यास मदत होईल’ असे म्हटले आहे, तर काहींनी हा सरकारच्या अतिरिक्त हस्तक्षेपाचा भाग असल्याची टीका केली आहे. दिल्लीतील एका युजरने उपहासात्मक टिप्पणी करत म्हटले की, “आम्हाला महागड्या सिगरेटची गरज नाही, दिल्लीची हवाच आमच्यासाठी ‘फ्री’ आहे.”