Batwara 1947: ‘बंटवारा 1947’चा दमदार फर्स्ट लुक समोर; सनी देओल ते प्रीती झिंटा, प्रत्येक कलाकाराचा लूक चर्चेत
Batwara 1947 स्टारकास्टचे पोस्टर्स शेअर करताना निर्मात्यांनी एक भावनिक संदेशही दिला आहे. “विभाजित झालेल्या जगात त्यांच्या धैर्याची ही कहाणी आहे. त्या लोकांना भेटा ज्यांनी हे सर्व सहन केलं,” असं त्यांनी म्हटलं आहे.

Batwara 1947: बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांची सुपरहिट जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यांच्या आगामी ‘बंटवारा 1947’ या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आलं होतं. आता चित्रपटातील प्रमुख कलाकारांचे फर्स्ट लुक पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आले असून त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
आमिर खान प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाचे मोशन पोस्टर्स याआधीच चर्चेत आले होते. आता प्रत्येक कलाकाराचा स्वतंत्र लुक समोर आल्याने चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे.
या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी ‘दुर्गावती देवी’ उर्फ ‘माई’ या महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या पोस्टरमध्ये त्या पांढऱ्या साडीत आणि अतिशय साध्या वेशात दिसत आहेत. कोणताही ग्लॅमरस लुक न ठेवता त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा संघर्ष, वेदना आणि भावनिकता या पात्राची खोली दाखवून देतात. त्यामुळे चित्रपटाची कथा अत्यंत संवेदनशील आणि भावनिक असणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
चित्रपटात सनी देओल ‘सिकंदर मिर्झा’ ही भूमिका साकारत आहेत. त्यांच्या पोस्टरमध्ये ते एखाद्याचा हात धरून भावूक अवस्थेत दिसत आहेत. त्यांच्या डोळ्यांमध्ये वेदना, तर चेहऱ्यावर संघर्ष स्पष्ट दिसतो. फाळणीच्या काळात द्वेष, हिंसा आणि अस्थिरतेच्या वातावरणातही मानवता जपणाऱ्या एका धाडसी व्यक्तीची ही कथा असल्याचं सांगितलं जात आहे.
अनेक वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणारी अभिनेत्री प्रीती झिंटा देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ती ‘हमीदा बेगम’ची भूमिका साकारणार आहे. पोस्टरमध्ये तिच्या डोक्यावर पदर असून तिच्या डोळ्यांतील भीती आणि वेदना प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. तिचा हा साधा पण प्रभावी लुक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
View this post on Instagram
सनी देओलचा मुलगा करण देओल देखील या चित्रपटात झळकणार आहे. तो ‘जावेद मिर्झा’ ही भूमिका साकारणार आहे. त्याचा गंभीर आणि तीव्र भाव असलेला लुक पाहता कथानकात त्याची भूमिका महत्त्वाची असणार असल्याचे दिसून येते.
अभिनेता अली फजल ‘हबीब अन्वर’ या भूमिकेत दिसणार आहे. वाढलेले केस, गंभीर चेहरा आणि दमदार व्यक्तिमत्त्व यामुळे त्याचा लुकही प्रभावी वाटत आहे. तर अभिनेता अभिमन्यू सिंह यालाही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका देण्यात आली आहे. तो चित्रपटातील प्रमुख विरोधी भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे.
स्टारकास्टचे पोस्टर्स शेअर करताना निर्मात्यांनी एक भावनिक संदेशही दिला आहे. “विभाजित झालेल्या जगात त्यांच्या धैर्याची ही कहाणी आहे. त्या लोकांना भेटा ज्यांनी हे सर्व सहन केलं,” असं त्यांनी म्हटलं आहे.
‘बंटवारा 1947’ हा चित्रपट भारताच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित असल्याचं सांगितलं जात आहे. त्या काळातील संघर्ष, मानवी नातेसंबंध, वेदना, त्याग आणि मानवतेची ताकद मोठ्या पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला जाणार आहे.
हा चित्रपट 14 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असून स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला प्रेक्षकांना एक भावनिक आणि ऐतिहासिक अनुभव देण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न आहे. सनी देओल आणि राजकुमार संतोषी यांची जोडी यापूर्वीही अनेक गाजलेले चित्रपट देऊन गेली आहे. त्यामुळे या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत.





