पुणे : महापालिकेतील पराभवानंतर अजित पवार यांनी तात्काळ आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग दिला आहे. आज पुण्यातील बारामती हॉस्टेल येथे अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचीही या बैठकीला उपस्थिती होती. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, या चर्चांआधीच अजित पवार गटाने निवडणूक तयारीला सुरुवात केली आहे. येत्या जिल्हा परिषद निवडणुकांत युवा नेतृत्वाला संधी देण्याचा फॉर्म्युला अजित पवारांची राष्ट्रवादी वापरण्याची शक्यता आहे. भाजपप्रमाणेच तरुण चेहऱ्यांना पुढे आणून संघटना मजबूत करण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, पुणे जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निलेश थिगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजगुरुनगरचे रहिवासी असलेले थिगळे गेल्या 9 वर्षांपासून युवक संघटनेत सक्रिय आहेत. संघटनात्मक अनुभव आणि युवकांमधील लोकप्रियतेमुळे त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बैठकीनंतर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी काही तालुक्यांत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार, तर काही ठिकाणी वेगवेगळे लढणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे ZP निवडणुकीआधी राष्ट्रवादीत पुन्हा एकदा भाकरी फिरण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.