Shirur : शिरूर नगरपरिषदेत सत्तेचा सारीपाट विस्कटला
Shirur : पाणीपुरवठा सभापती सुनीता पोटे यांनी नऊ कोटींच्या नवीन पाइपलाइन निधीतील कामांबाबत आपल्याला विश्वासात घेतले नसल्याचा आरोप केला.

शिरूर : शिरूर नगरपरिषदेतील सत्ताधारी आघाडीत मोठा राजकीय भूकंप झाला असून, मित्रपक्षच आता एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. उपनगराध्यक्षांविरोधातील अविश्वास ठरावानंतर भाजपाचे नितिन पाचर्णे उपनगराध्यक्ष झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाने आघाडीतून बाहेर पडण्याची भूमिका घेत सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. ‘आमच्या नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला’, ‘नगरपरिषदेचा कारभार शिरूरमधून नव्हे तर वाघोलीतून चालतो’, असा आरोप माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे यांनी केला. विकासकामांसाठी ठेकेदारांकडून टक्केवारी मागितली जात असल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी केला.
पाणीपुरवठा सभापती सुनीता पोटे यांनी नऊ कोटींच्या नवीन पाइपलाइन निधीतील कामांबाबत आपल्याला विश्वासात घेतले नसल्याचा आरोप केला. माहिती अधिकारातूनही माहिती मिळत नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. तर माजी उपनगराध्यक्ष मितेश गादिया यांनी कामांच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केल्याने आपल्याला राजीनाम्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप केला.
कटके यांना बदनाम करू नका
दुसरीकडे नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे यांनी हे आरोप फेटाळून लावत आमदार माऊली कटके यांचा नगरपरिषदेच्या कारभारात कोणताही हस्तक्षेप नसल्याचे स्पष्ट केले. नगरपरिषदेचा कारभार सक्षमपणे सुरू असून, काहीजण सभागृह नेते प्रकाश धारिवाल यांच्या नावाचा राजकीय स्वार्थासाठी वापर करीत असल्याचा पलटवार त्यांनी केला. आमदार कटके यांना विनाकारण बदनाम करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.





