पुणे -उन्हामुळे हैराण राज्यातील जनतेला थोडा दिलासा मिळणार आहे. येत्या दोन दिवसांत पूर्वमोसमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, लातूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे. उन्हाच्या चटक्याने तापलेल्या महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान झाले आहे. सकाळपासूनच असलेल्या उन्हाच्या चटक्यापाठोपाठ दुपारनंतर ढग जमा होत आहेत. रविवारी रावेर तालुक्यातील (जि. जळगाव) खिरोदा, चिनावल, वाघोता भागांत वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.
विदर्भ, मराठवाड्यात अंशत: ढगाळ हवामान झाले होते. रविवारी वर्धा येथे उच्चांकी 45.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भ, मराठवाड्यात बहुतांशी पारा 40 अंशांच्या पुढे गेला आहे. पुण्यातही तापमान 39 अंश सेल्सिअस नोंदविले गेले.